Sunday, March 10, 2019

कडबा विक्रीला बंदी घालण्याची मागणी


दुष्काळामुळे जनावरांच्या चार्याची होतेय हेळसांड
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्याने तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जत तालुक्यात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जात असल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांना चारा उपलब्ध होत असे. मात्र, यंदा ज्वारीची पेरणी नसल्याने तालुक्यात चार्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, दुष्काळजन्य परिस्थितीत बाहेरच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चारा विक्रीला व्यावसायिक नेत असल्याने यावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी जत तालुक्यात 60 हजार हेक्टर क्षेत्रावर प्रतिवर्षी होते. यंदा निसर्गाने हुलकावणी दिल्यामुळे ज्वारीची पेरणी होऊ शकलेली नाही. परिणामी जतच्या शिवारात कुठेही कडबा उपलब्ध नसल्याने जनावरे कशी जगवायची, असा प्रश्न पशुपालकांपुढे उभा आहे. जिल्ह्यातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणात कडबा शेजारचा जिल्हा व कर्नाटकामध्ये विक्रीस व्यवसायिक ट्रक, ट्रॅक्टर भरून घेऊन जात असल्याचे चित्र आहे. सध्या जिल्ह्यात चार्याची भीषणता असल्याने या चारा विक्रीवर जिल्हाधिकारी यांनी बंदी आणून विक्रीस जाणारा चारा थांबवावा, अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. साखर कारखाने चालू होते तोपर्यंत वाड्याचा उपयोग चार्यासाठी केला जात होता. कारखाना स्थळावरून काही शेतकर्यांनी महागडे वाडे आणून आपली जनावरे जगवली. मात्र सद्यःस्थितीत साखर कारखाने बंद झाल्यामुळे जनावरांना काय द्यायचे असा प्रश्न शेतकर्यांपुढे आहे. काही पशुपालक चार्याअभावी जनावरांना बाजार दाखवत आहेत. बाजारातही जनावरांचे दर कोसळल्यामुळे म्हणेल त्या किमतीला विक्री करून पशुपालक येत आहेत. परिणामी या विक्रीमुळे खिलार जनावरे संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला. मात्र, अद्यापही जनवारांच्या चार्याची सोय केली नाही.चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पुढारी निवडणुकीत गुंतल्याने जनावरांच्या चार्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नसल्याचा आरोप पशुपालकांकडून होत आहे. सरकार घोषणा करते मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकर होत नसल्यामुळे शेतकर्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. हिरव्या चार्याचेही दर कडाडले असून कडवळ 2 हजार रूपये प्रतिगुंठा तर मका दीड हजार प्रति गुंठा विक्री सुरू आहे. पशुखाद्याचेही दर गगणाला भिडले आहेत. या सर्व कारणांमुळे पशुपालकांचा जीव जनावरे सांभाळण्यात मेटाकुटीला येत आहे.

No comments:

Post a Comment