Wednesday, March 27, 2019

जत पूर्व भागातील राष्ट्रीय महामार्ग एकपदरीच कामाची चौकशी करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत पूर्व भागातून जाणाऱ्या पंढरपूर -उमदी-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम हे पंढरपूर ते उमदी पर्यत पूर्ण करण्यात आले आहे. पण याच महामार्गापैकी जत तालुक्याच्या हद्दीतीलच उमदी ते को.बोबलाद हा 36 किमीचा रस्ता सिंगलपदरीच ठेवून शासनाच्या आणि लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार केला आहे.या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

अगोदरच्या सिंगल पदरी रस्त्याची डागडुजी करून रस्त्याच्या दोन्हीही बाजूने चुना लावला आहे . त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग असूनही दळणवळणास मर्यादा येत आहेत.यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा होत असून शासनाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.                                 
पंढरपूर -विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे महाराष्ट्र हद्दीतील काम हे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असुन त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ते उमदीचेच दोनपदरी काम करून क्राॕकिटीकरण करण्यात आले आहे पण जत तालुक्याच्या हद्दीतीलच उमदी ते को.बोबलाद 36 किलोमीटरच्या  रस्त्याचेसुद्धा क्राॕकिटीकरण आणि दुपदरीकरण  मंजूर असताना मात्र लोकांच्या डोळ्यांत धूळ टाकून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप होत आहे.
सध्या या रस्त्याची थोडी फार डागडूजी करुन त्याच्या दोन्हीही बाजूला नुसता चुना लावून सिंगलपदरीच ठेवण्यात आला आहे .याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  हा नेमका काय प्रकार आहे,हे जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधला असता या रस्त्यासाठी निधी नसल्याचे सांगण्यात आले. पंढरपूर -विजयपूर राष्ट्रीय महामार्गच्या सोलापूर आणि कर्नाटकातील हद्दीतील दुपदीकरण करण्यासाठी निधी कमी पडत नाही पण जत तालुक्याच्या हद्दीतीलच याच रस्त्याला निधी कसा मिळत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
सोलापूर जिल्हातील प्रदेशासारखाचा हा सुद्धा माळरांनाचा आणि खडकाळ प्रदेश असुन पर्यावरण विभागाने परवानगी नाकारण्याचे कारण काय असु शकते. कदाचित  हा प्रदेश सोलापूर जिल्ह्यात येत नाही म्हणून तेथील लोकप्रतिनिधीनी सोलापूरच्या कार्यालयात त्यांचे वजन वापरून त्यांच्याच भागातील महामार्गाची कामे पहिल्यांदा पूर्ण करून घेतली कि काय ? असे नागरिकांतून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत जत तालुक्यातील लोकप्रतिनिधी का मूग गिळून गप्प आहेत, असाही सवाल उपस्थित होत आहे. या लोकांचा त्यांना मूक संमती आहे का असा सवाल पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment