Sunday, March 3, 2019

‘बाईक’ची अशी घ्या काळजी


गर्लफ्रेंड नसलेले किंवा असलेलेही अनेक जण माझी ‘बाईक’ हेच माझं पहिलं प्रेम आहे, असं अगदी छातीठोकपणे सांगतात. पण आपल्या या ‘प्रेमा’ची काळजी कशी घ्यायची हे मात्र त्यांना माहीत नसतं. अशाच बाईकप्रेमींसाठी त्यांच्या मेहबूबाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स...

टायर चेक -टायरबाबतीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायरमधील प्रेशर म्हणजेच हवा चेक करा. टायरला कुठेही स्क्रॅच किंवा कट गेलेला नाही ना, याची खात्री ठेवा. आपल्या बाईकचा परफॉर्मन्स हा बराचसा तिच्या टायर्सवर अवलंबून असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी टायरचा चेक करा. 
इंजिन ऑईल- बाईकच्या आरोग्यातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंजिन ऑईल. त्याच्या योग्य प्रमाणामुळेच आपलं इंजिन स्मूथली चालतं. ऑईलच्या लेव्हलवरंच इंजिनचा परफॉर्मन्स असल्यामुळे ऑईल लेव्हल नेहमी योग्य आहे ना, याची खात्री ठेवा. तसेच कुठूनही ऑईल लिकेज होणार नाही याची खबरदारी घ्या.
 एअर फिल्टर -आपल्या गाडीतील एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा. भारतातील धुळीयुक्त वातावरणामुळे आपल्याकडे फिल्टर्स लवकर खराब होतात. त्यामुळे फिल्टर्सची काळजी घेणंही गरजेचं आहे. 
क्लच अ‍ॅडजस्टमेंट- हा गाडीतील सर्वांत जास्त प्रमाणात वापरल्या जाणार्‍या पार्टस्पैकी एक आहे. त्यामुळे त्याची अ‍ॅडजस्टमेंट हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. क्लचला योग्य मूव्हमेंट घेता येईल व तो जास्त घट्ट किंवा लूज होणार नाही, हे तपासा. हे प्रमाण चुकल्यास त्याचा परिणाम थेट बाईकच्या फ्युएल एफिशियन्सीवर होऊ शकतो.
 इंजिन- इंजिन म्हणजे गाडीचं हृदय असतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याचं वेळोवेळी सर्व्हिसिंग आणि ट्युनिंग होणं बाईकच्या एकंदर लाईफसाठी गरजेचं आहे. इंजिनच्या काळजीतला महत्त्वाचा भाग म्हणजे कार्बोरेटरची सफाई होय. दर 1500 किलोमीटरनंतर आपण कार्बोरेटरकडे जातीने लक्ष द्यायला हवं. स्पार्क प्लगचीही स्वच्छता आपण न चुकता करायला हवी. जुन्या गाड्यांनी चोक व्यवस्थित काम करतो आहे ना, हे वेळोवेळी पाहायला हवं.
 क्लिनिंग- गाडीच्या मेकॅनिकल पार्टस्बरोबरच तिचा लूकही जपणं गरजेचं असतं. त्यासाठी गाडीला वेळोवेळी पुसल्यास तिची चमक जाणार नाही आणि जास्तीत जास्त दिवस गाडी नवीन दिसेल.
 बॅटरी -आजच्या पॉवर स्टार्टच्या जमान्यात बॅटरी हा एक अतिशय महत्त्वाचा पार्ट ठरतो. बॅटरीच्या चांगल्या आणि प्रॉब्लेम-फ्री वर्किंगसाठी तिचा मेंटेनन्स हाच एकमेव उपाय असतो. बॅटरीतून कोणतेही लिकेज होत नाही ना किंवा ती व्यवस्थित चार्जड् आहे की नाही, याकडे आवर्जून लक्ष द्या. 
ब्रेक्स -गाडी चालविताना गरजेची अशी एक गोष्ट म्हणजे ब्रेक्स. यामध्ये दोन्ही ब्रेकची अलाईनमेंट व्यवस्थित आहे याची खबरदारी घ्या. तसेच कोणताही ब्रेक जास्त टाईट किंवा जास्त लूज ठेवू नका. दोन्ही ब्रेक समप्रमाणात टाईट असावेत. या झाल्या बाईक एका जागेवर उभी असताना घ्यायच्या खबरदार्‍या, पण एक सगळ्यात महत्त्वाची काळजी आपल्याला बाईक चालवितानाच घ्यावी लागते, ती म्हणजे बाईकचा स्पीड. आपल्या बाईकचा स्पीड हा शक्यतो 40 ते 60 च्यादरम्यान असावा, तो तुमचं पेट्रोलंही वाचवेल आणि बाईकचं लाईफही वाढवेल!


1 comment: