सोलापूर,(प्रतिनिधी)-
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा
कार्यक्रम जाहीर केला असून यात दुसर्या
टप्प्यात माढा मतदारसंघासाठी 18 एप्रिलला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी
23 एप्रिलला मतदान होणार आहे. ही निवडणूक शांततेत
व मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची
काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर
उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी
डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
रविवारी, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर सायंकाळी डॉ. भोसले यांनी या निवडणुकीसाठीची प्रशासनाने केलेली तयारी, मताचा टक्का वाढविण्यासाठी सुरू असलेली जनजागृती, संवेदनशील मतदान केंद्रे याबाबतची माहिती दिली.
जिल्हाधिकारी म्हणाले, या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 33 भरारी पथके नियुक्त केली असून या पथकांमार्फत सर्वच विधानसभा मतदारसंघात पाहणी करण्यात येणार आहे. तर तीन केंद्रीय निरीक्षक यासाठी नेमण्यात आले आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांकडील पदाधिकार्यांच्या गाड्या ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
निवडणूक खुल्या वातावरणात पार पडावी, मतदान प्रक्रिया पारदर्शक राहावी या हेतूनेच निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता तयार केली आहे. आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविली जाईल. आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय पक्षावर टिकाटिप्पणी करता येणार नाही, शांततेचा भंग करता येणार नाही, तसेच राजकीय पक्षांना सार्वजनिक मैदाने उपलब्ध करुन देताना उच्च न्यायालयाच्या निकषानुसार कार्यक्रमासाठी उपलब्ध करुन देण्यात येतील. उमेदवारांनी धार्मिक स्थळांचा प्रचार व प्रसारासाठी वापर करू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी यावेळी दिल्या. ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी त्याठिकाणी विशेष निवडणूक कार्यक्रम राबवून मतदानासाठी जनजागृती केली जाईल. तसेच मतदानाच्या आठ दिवस अगोदर बूथ लेव्हल अधिकारी यांच्यामार्फत मतदारांना व्होटर स्लीप देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात एकूण 33 लाख 44 हजार 585 मतदार असून नव मतदार वाढीसाठी प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. संवेदनशील मतदारसंघात संबंधित आवश्यक यंत्रणेकडून पाहणी करुन त्याचा अहवाल प्राप्त होताच संवेदनशील मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात येतील. आचारसंहितेच्या कालावधीत बँकांनी आपली रक्कम वाहतूक करताना संबंधित यंत्रणेला सूचना द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment