Monday, March 4, 2019

माडग्याळमध्ये टँकर असूनही पाणीटंचाई


जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ (ता. जत) येथे सरकारी टँकर चालू असूनही वेळेला पाणी मिळत नसल्याने पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक पूर्णतः वैतागले असून वरिष्ठ विभागाने लक्ष देऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. माडग्याळमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे.
गावठाण व वाडीवस्तीवर दोन टँकर असे प्रत्येकी 2.75 खेपा मंजूर आहेत. गेली दोन महिने झाले टँकर चालू आहे. मध्यंतरी मंगळवेढ्याच्या गटविकास अधिकार्यांनी भेट दिली. प्रत्येकी 2.75 खेपा रोज पाणीपुरवठा करण्याचे असताना कधी 1 खेप व कधी दोन खेपा रजिस्टरला घातल्याचे दाखवत होते. तत्कालीन ग्रामसेवकाला अधिकार्यांनी पाणी पुरवठा व्यवस्थित करण्यास सांगितले होते. अधिकार्यांकच्या सूचनेला माडग्याळ ग्रामपंचायत व ग्राम सेवकाने केराची टोपली दाखवली. गावठाण हद्दीत सुधारणा झाली मात्र वाडीवस्तीवर 8 दिवसाला येणारे पाणी 13 ते 15 दिवसाला येऊ लागले आहे. रोज 1 किंवा दोनच खेपा होत आहेत. त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा होताना दिसत नाही. कधी टँकर चा ड्रायव्हर येत नाही, तर कधी टँकरचा बिघाड झाला, असे उत्तर दिले जाते. पाणीपुरवठा विभाग व ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे माडग्याळकर वैतागले आहेत. ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभाराने पाणी असूनही व टँकर चालू असूनही पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्राम सेवकाला टँकरसंदर्भात विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष ग्रामपंचायत व प्रशासनाचा भोंगळ कारभार देऊन माडग्याळ चा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

No comments:

Post a Comment