Friday, March 29, 2019

चिंच उत्पादनात कमालीची घट

जत,(प्रतिनिधी)-
चिंचेच जरी नुसते नाव काढले तरी, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. जिल्ह्यात चिंचेच्या झाडांची लागवड करून उत्पन्न मिळवणार्‍यांची संख्या मोठी आहे. पण यावर्षी कमी पाऊस, प्रतिकूल हवामानामुळे चिंचेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादनात घट होणार असल्याने आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे चिंच उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

यावर्षी वातावरणातील  लहरीपणाचा चिंचेचा झाडांना चांगलाच फटका बसला आहे. म्हणावा तसा फुलोरा यावर्षी झाला नसल्याने, झाडांना चिंचा कमी लागल्या आहेत. महाराष्ट्रात सर्वत्र आढळणार्‍या चिंचेची लागवड जिल्ह्यातील खास करुन जतसारख्या दुष्काळी, कोरडवाहू पट्ट्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. मध्यम साधारण जमिनीवर चिंचेची लागवड केली जाते. चांगले उत्पन्न देणारे हे पीक कोरडवाहू पट्ट्यात आजपर्यंत वरदान ठरले आहे.
ग्रामीण भागात आजही ओढ्यालगत, बांधावर, खोपटी शेजारी, देवस्थानच्या ठिकाणी चिंचेची भली मोठी झाडे पहायला मिळतात. शासकीय विभागाकडून प्रत्येक वर्षी रस्त्याच्या कडेला लावण्यात येणार्‍या झाडांमध्ये चिंचेला प्राधान्य दिले आहे.
खाद्यपदार्थांची  रुची वाढवण्यासाठी चिंचेचा वापर करतात. याचबरोबर चिंचेचा सार, चिंचेची चटणी, चिंचेचा कोळ, चिंचेचा अर्क बनवला जातो. चिंचेला आयुर्वेदातही खूप महत्व आहे. अनेक आयुर्वेदिक उपचारामध्ये चिंचेचा वापर केला जातो. या झाडाच्या  लाकडाचा कापड उद्योग, फर्निचर, शेतीचे औजारे बनवण्यासाठी वापर केला जातो.
शासनाकडून जनजागृतीची गरज 
चिंचेतून प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. यामधून दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी चांगला नफा मिळवतो. या चिंचेला अगदी देशाबाहेरूनही मोठी मागणी आहे.
संशोधनांची गरज
जिल्ह्यात पडीक शेतीचे प्रमाण जास्त आहे. त्यात चिंचेची लागवड केल्यास कमी पाण्यावर जास्त उत्पादन मिळू शकते. कालानुरूप चिंचेच्या नवनवीन जाती, तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी संशोधन केंद्राने पुढाकार घेऊन यामध्ये संशोधन करण्याची गरज आहे.
यावर्षी कमी प्रमाणात पडलेल्या पावसामुळे झाडांना फळधारणा कमी झाली आहे. त्याचबरोबर दरही घसरला आहे. गेल्या वर्षी 3200 ते 3300 रुपये क्विंटल दर होता. पण यावर्षी 2500 ते 2600 रुपयांपर्यंत दर घसरला आहे,असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment