जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच रंगतदार बनत चालले असून रोज एक नवनवीन
राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजपचा उमेदवार निश्चित झाला असला तरी काँग्रेसकडून अद्याप चित्र स्पष्ट करण्यात आले नाही.
ही जागा स्वाभिमानीला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच माजी मंत्री आणि काँग्रेसकडून इच्छूक असलेले प्रतिक पाटील यांनी काँग्रेस
पक्षाचा राजीनामा दिल्याने मोठी संभ्रवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आयाराम-गयाराम लोकांची अडचण झाली आहे.
त्यांना कोणता झेंडा हाती घेऊ, कळेनासे झाले आहे.
सांगली जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला
म्हणून ओळखला जायचा. सद्या काँग्रेसराष्ट्रवादी आपल्या
मित्रपक्षांच्या लवाजम्यासह निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. परंतु सांगलीच्या तिकीटाचा अजूनतरी घोळ काही संपता संपेना त्यामुळे कार्यकर्तेही
चांगलेच गोंधळात पडलेत. काँग्रेसने तर सांगलीच्या उमेदवारीवर
आपला दमदार दावा केला आहे. परंतु त्यातूनही सांगलीची जागा स्वामीमानी
या मित्रपक्षाला जाणार असल्याचे वावटळ उठू लागल्याने अनेकजण अवाक् झाले आहेत.
भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विद्यमान
खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून
उमेदवार जाहीर झाला असला तरी भाजपमधून बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर यांनीही मैदानात
उतरण्यासाठी दंड थोपटले असून बर्याच राजकीय घडामोडी सुरू झाल्या
आहे.
धनगर समाजाचा
आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून गोपीचंद पडळकर यांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून चांगलेच रान उठविले आहे. त्यातूनच त्यांनी
समाजाचे नेतृत्व करीत आता थेट लोकसभेच्या मैदानात उतरण्याची जय्यत तयारी सुरू केल्याने
राजकीय वर्तुळात काही बड्या नेत्यांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. काँग्रेस पक्षातही बरीच अंतर्गत बंडाळी माजली असून लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर
काँग्रेसतंर्गत राजकारणात बरीच वादळे उठली आहेत. अगदी काँग्रेस
कमिटीला कुलूप लावण्यापासून ते कुलूप काढण्यापर्यंतचे नाट्य चांगलेच रंगले होते.
या नाट्याची अगदी मुंबईपर्यंत जोरदार चर्चा झाली. त्यामुळे काँगे्रसतंर्गत धुमसत असलेला अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी वरीष्ठ नेत्यांना
तारेवरची कसरत करावी लागत आहे. काँग्रेसमधील ही धुसफूस अखेर थांबणार
तर केव्हा? असा थेट सवाल आता काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांतून
केला जात आहे.
दादा घराण्यातील विशाल पाटील यांनी सांगलीची जागा
स्वाभिमानीला सोडल्यास बंडखोरी करणार असल्याचा इशारा दिला आहे. हाच मुद्दा धरून खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसने सांगलीतला वाद आधी मिटवावा,
असे आवाहन केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या
पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमावस्था
असून कोण कुणाच्या पाठीशी राहील. याबाबतच चित्र मात्र प्रचाराच्या
रणधुमाळीमध्येच स्पष्ट होईल. अनेकांनी आता गावोगाव फिरून कार्यकर्त्यांचा
लवाजमा एकत्र करण्यास सुरूवात केली असून काहीजणांच्या गुप्त बैठकाही सुरू आहेत.
त्यामुळे अजूनही काही बेरक्या कार्यकर्त्यांमध्ये “कोणता झेंडा घेऊ हाती...’’, अशीच त्यांची सद्याची तर
अवस्था आहे.
No comments:
Post a Comment