Saturday, March 2, 2019

सातार्‍यात उद्या रामोशी समाज आरक्षण परिषद


सांगली,(प्रतिनिधी)-
 रामोशी जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा यासह विविध मागण्यांसाठी त्याचबरोबर महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी सोमवार, दि. 4 मार्च रोजी सातारा येथील शाहू कला मंदीर येथे रामोशी समाज आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या राज्याध्यक्षा प्रियाताई नाईक यांनी दिली. राज्याध्यक्षा प्रियाताई नाईक म्हणाल्या, स्वाभिमानी रामोशी महासंघाच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर हे भूषविणार असून आमदार शिवेंद्रराजे भोसले हे उद्घाटक आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयदेव गायकवाड, कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रामोशी समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून स्वाभिमानी महासंघाच्यावतीने सातार्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यासह राज्यातील समाजबांधव मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, ब ी ड  , उस्मानाबाद आदी रामोशी या नावाने समाजाची ओळख आहे. हा रामोशी समाज विमुक्त जाती अ मध्ये नंबर 11 वर आहे. या रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे गरजेचे आहे. कारण रामोशी रानावनात, दर्याखोर्यात राहणारा हा रानवासी म्हणजे रामोशी अशी ओळख आहे. त्यावरून ते आदिवासी असल्याचे सिध्द होतेच. कर्नाटक राज्यालगत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, आजरा, कागल या ठिकाणी बेरड म्हणून ओळखले जाते. या जातीला विमुक्त जाती अ मध्ये नंबर 1 वर आहे. सोलापूर, लातुर, उस्मानाबाद या ठिकाणी बेडर या नावाने ओळखले जाते, ही जात अनुसूचित जातीमध्ये मोडत आहे. उर्वरित राज्यात बेरडा ही जात अनुसुचित जमातीमध्ये आहे
ही बेडर, बेरड आणि बेरडा या तिन्ही जाती एकच असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रभागात आहेत. त्यामुळे तिन्ही जातीच्या सर्व सुविधा बेरडा जातीला देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी प्रियाताई नाईक यांनी यावेळी बोलताना केली. त्या पुढे म्हणाल्या, स्वराज्याचे शिलेदार गुप्तहेर बर्हिजी नाईक यांची बानुरगड जि. सांगली या ठिकाणी समाधी असून या समाधीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना शासनाने आद्य क्रांतीवीर म्हणून घोषित करावे आदी मागण्यांसाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे राज्याध्यक्षा प्रियाताई नाईक यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी रामोशी महासंघाचे सचिव सदाशिव नाईक, हणमंत चव्हाण, योगेश चव्हाण, सोमनाथ बोरडे, प्रल्हाद जाधव, रविराज मदने आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment