मोटार आणि टेम्पोत जोरदार धडक
सांगली,(प्रतिनिधी)-
मालवाहू
टेम्पो आणि मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दहावीतील विद्यार्थ्यासह दोघेजण
ठार झाले. दहावीचा पहिला पेपर देऊन परतणार्या मोटारीलाच अपघात झाल्याची गंभीर घटना शुक्रवारी कवलापूरनजीक घडली.
या अपघातात 12 जण जखमी झाले असून त्यांच्यामध्येही
दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कवलापूर ते कुमठे फाटादरम्यान
असलेल्या सिध्देश्वर मंगल कार्यालयानजीक अपघाताची ही घटना दुपारी
तीनच्या सुमारास घडली. या अपघातात दहावीचा विद्यार्थी सुमित सुखदेव
गावडे (वय 16, रा. कुमठे, ता. तासगाव), टेम्पोचा चालक बाबू लक्ष्मण पवार (20, रा. खरसुंडी, ता. आटपाडी) या दोघांचा मृत्यू झाला आहे.
जखमींमध्ये आदित्य काशिनाथ
पाटील (16), वेदांत दादासाहेब गावडे (16), ऋतुराज आनंदा भंडारी (16), आकाश संजय पाटील
(16), शुभम रमेश भोसले (16), मोटारीचा चालक प्रशांत
प्रभाकर पाटील (35, सर्व रा. कुमठे),
तसेच मालवाहू टेम्पोतील मारुती शंकर पवार (19) व लक्ष्मण पवार (40, खरसुंडी) यांचा
समावेश आहे. या सर्व जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल
करण्यात आले आहे. जखमींपैकी आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती
चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. चार विद्यार्थी किरकोळॉक्टरांच्या
निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला
सुरुवात झाली. कुमठे हायस्कूल आणि लोकनेते दिनकरआबा पाटील माध्यमिक
व उच्च मान्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कवलापूर (ता. मिरज) येथील पंडित नेहरू विद्यालयात
आहे. परीक्षेला वेळेत पोहोचता यावे आणि पुन्हा लवकर घरी येऊन
पुढच्या पेपरच्या अभ्यासाला गाठ घालणे सोयीचे व्हावे म्हणून गावातील दहा विद्यार्थ्यांनी
गावातीलच प्रशांत पाटील याची मोटार (एमएच 04 सीटी-2220) ठरविली होती. शुक्रवारी
मोटारीने ते परीक्षेला आले. पेपर सुटल्यानंतर तीन वाजता ते कुमठेकडे
मोटारीतून परतत होते. कवलापूरपासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांची
मोटार आली असता चालक पाटील याने अन्य एका वाहनाच्या बाजूने पुढे निघण्याचा प्रयत्न
केला आणि त्याची मोटार थेट जाऊन समोरून येणार्या मालवाहू टेम्पोला
धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, मोटार
आणि टेंपो (एमएच 04 एफजे-9745) या दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. धडकेनंतर मोटार रस्त्याच्या
विरुद्ध बाजूला शेतात जाऊन पलटी झाली, तर टेम्पो रस्त्याकडेच्या
झाडीत घुसला. या अपघाताची गंभीरता ओळखून परिसरातील नागरिकांनी
आणि काही वाहनधारकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. अपघातग्रस्त मोटारीत
अडकलेले काही विद्यार्थी बाहेर येण्याचा प्रयत्न करीत होते. नागरिकांनी
उलटलेली मोटार उभी करुन विद्यार्थ्यांना बाहेर काढले. त्यानंतर
तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात नेले. टेम्पोचा चालक बाबू
पवार यास डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले, तर सुमित गावडे
याचा उपचार सुरू असतानाच सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
दहावीच्या पहिला पेपरला जाताना पालकांच्या शुभेच्छा घेऊन गेलेले विद्यार्थी
पेपर कसा गेला, हे सांगण्यासाठी मनाची तयारी करून घरी परतत असतानाच
त्यांना भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. तिकडे मुलांची वाट
पाहणार्या पालकांना अपघाताचे वृत्त समजताच त्यांची धावपळ उडाली.
पालकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांची
प्रकृती कशी आहे, याबद्दल डॉक्टर काहीच सांगत नव्हते.
त्यामुळे पालकांचा आक्रोश सुरू केला. पोलिसांनी
त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. दोन विद्यार्थ्यांवर अतिदक्षता
विभागात, तर अन्य विद्यार्थ्यांवर इतर दोन वॉर्डांमध्ये उपचार
सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच खासदार संजय पाटील,
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, विशाल पाटील,
राष्ट्रवादीचे अविनाश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत
बगाडे, शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी-पाटील,
प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील यांनी शासकीय रुग्णालयास येऊन जखमींची विचारपूस केली.
No comments:
Post a Comment