Thursday, February 28, 2019

उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये संभ्रमावस्था


सांगली लोकसभा निवडणूक
जत,(प्रतिनिधी)-
देशभरात काही दिवसांतच लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असून प्रशासनाने त्यादृष्टीने हालचालीही सुरू केल्या आहेत. मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले असून मतदान केंद्राशी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण आखले जात आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे विद्यमान खासदारांनी आपल्या कामांच्या उदघाटनांचा धडाका सुरूच ठेवला आहे. असे असताना एकेकाळी सांगली जिल्हा बालेकिल्ला राहिलेला असताना काँग्रेसमध्ये मात्र अजून अस्वस्थता दिसून येत नाही. कारण त्यांच्यात लोकसभेचा उमेदवारच निश्चित झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतताच दिसून येत आहे. सध्या काँग्रेसकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कोण उभारणार,याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

जनावरांना चार्‍याची व्यवस्था करा सोमनिंग बोरामणी यांची मागणी


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्याचा पूर्वभाग हा सध्या दुष्काळाच्या टंचाईने हैराण झाला असून जनावरांना खाण्यासाठी चारा उरला नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पशुपालक शेतकर्यांसाठी चारा छावणी किंवा थेट अनुदान देऊन दुष्काळामध्ये मदत करावी, अशा मागणीचे निवेदन सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी तहसीलदार यांना दिले.

पुण्यात शिक्षक संघाची शनिवारी शिक्षण परिषद, मेळावा


जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा 2 मार्चला पालखी मैदान सासवड, पुणे येथे होत असून या शिक्षण परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नगरविकास राज्य मंत्री रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे हे उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक या शिक्षण परिषदेत सहभागी होणार असून शासनाने यासाठी 28 ते 2 मार्च दरम्यान तीन दिवसांची सुट्टी शिक्षकांना दिली आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी ही माहिती पत्रकार बैठकीत दिली.

पाण्याचा टँकर उलटल्याने चालक ठार


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील अंकलगी -करजगी रस्त्यावर पाणीपुरवठा करणारा टँकर उलटून अपघात झाला. त्यामध्ये चालक संजय उत्तम माळी (वय 36 रा. कुंभारी, ता. जत) ठार झाला; तर क्लिनर गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. हा अपघात रात्री झाला. उमदी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

सांगली जिल्ह्यात होणार 862 प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांची भरती


सांगली,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या 627, उर्दू शिक्षक 19, कन्नडचे 13, तर माध्यमिक शिक्षकांच्या 203 जागा भरल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवित्र पोर्टलचे उदघाटन केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली.

जालिहाळ परिसरातील 400 कुटुंबांना धान्यपुरवठा


येरळा प्रोजेक्टचा उपक्रम
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जालिहाळ परिसरात 50 टक्केच पाऊस पडल्याने मार्च ते जुलै या पाच महिन्यांसाठी 400 कुटुंबांसाठी धान्य पुरवठा करणारा पाषाण पालवी उपक्रम राबवण्यात येत आहे. येरळा प्रोजेक्ट सोसायटी आणि टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन या संस्थेने याचे संयोजन केले आहे. ज्वारी पाच किलो, तांदूळ तीन किलो, डाळ एक किलो, खाद्यतेल एक किलो, साखर एक किलो, चहा 200 ग्रॅम, मसाला-चटणी 250 ग्रॅम पाच महिन्यासाठी 400 जणांना वस्तूंचे किट देणे आवश्यक आहे.

नोकरीच्या आमिषाने तरुणांना 5 लाखांचा गंडा



जयसिंगपूर,(प्रतिनिधी)-
 मित्राच्या पुतण्याला व पत्नीला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे नोकरी लावतो, अशी बतावणी करून संजय श्रीकांत आमणे (रा. कोष्टी गल्ली, पेठवडगाव, ता हातकणंगले) याने दोन मित्रांना तब्बल 5 लाख रुपयांचा चुना लावून फसवणूक केली. याबाबतची फिर्याद रमेश दत्तात्रय टोपकर (दाभाडे) व पंढरीनाथ विष्णू मिरजे (दोघे रा. पेठवडगाव) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात दिली.

आतेबहिणीवर बलात्कार करणार्‍यास 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा


सांगली,(प्रतिनिधी)-
 चाकूचा धाक दाखवून व बेशुध्दीच्या गोळ्या खाण्यास भाग पाडून आतेबहिणीवर बलात्कार करणारा आरोपी सचिन वसंत कांबळे (वय 30, भारत सूतगिरणी, कुपवाड) याला गुरुवारी सांगली कोर्टाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी दिला. सरकारी वकील म्हणून आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले. कुपवाड नजीकच्या बामणोलीत पीडित मुलगी मावशीच्या घरी राहत आहे.

‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जतवाल्यांचा मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
 म्हैसाळ कालव्यामधून व्हसपेठ तलावात पाणी येण्यासाठी दोन किलोमीटरचे काम लोकसहभागातून करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी, यासह जत तालुक्यातील 46 गावांच्या सिंचनाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी झालेल्या पाणी परिषदेनंतर गुरुवारी तपोवन रेवणसिद्ध चिक्कलगीचे तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात


उमदी परीक्षा केंद्र कुप्रसिद्ध;41 हजार 729 विद्यार्थी परीक्षा देणार
जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून (शुक्रवार) मराठीच्या पेपरने सुरुवात होत आहे. जिल्ह्यातील 103 केंद्रांवर 41 हजार 729 विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मनातल्या अभिव्यक्तीचा उत्स्फूर्त अविष्कार म्हणजे कविता : सांगोलकर

जत,(प्रतिनिधी)-
आपल्या सभोवताली जे घडते, आपण जे पहातो त्याचा संवेदनशील अंतःकरणातून उमटलेला उत्स्फूर्त हुंकार म्हणजे कविता असते. ही संवेदना प्रत्येकाच्याच काळजात निर्माण होत असते. ही भावना खऱ्या अर्थाने व्यक्त आणि अभिव्यक्त व्हायला हवी, असे मत कवी रवी सांगोलकर यांनी व्यक्त केले.

मराठी म्हणींचे जतन व संवर्धन झाले पाहिजे: डॉ. ढेकळे

जत, (प्रतिनिधी)-
मराठी भाषेत समृद्ध असे साहित्य आहे. त्याचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करा. आपणास यशापर्यंत जायचे असेल तर विद्यार्थ्यांनी दररोज काहीतरी वाचन केले पाहिजे. असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले.

माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचा राष्ट्रवादी काँगेसाचा राजीनामा

जत,(प्रतिनिधी)-
राष्ट्रवादी  कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे सादर केला आहे .याबाबतचे निवेदन व राजीनामापत्र त्यांनी प्रसिद्धीसाठी दिले आहे.

42 गावांचा प्रश्न लोकसहभागातून सोडवणार:तुकाराम महाराज

जत,(प्रतिनिधी)-
जत  तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी व जनतेला राजकीय नेत्यांनी आजपर्यंत फसविले आहे . दहा किलो मीटर परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी आले असतानाही ४६  गावांना अद्याप पाणी देण्यात आले नाही . दहा किलोमीटर कॅनाँलचे काम दोन महिन्यात पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर पूर्व भागातील गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे . परंतु शासनाकडून यासंदर्भात कोणतीही उपाय योजना किंवा ठोस आश्वासन दिले जात नाही .त्यामुळे सदरचे काम  लोकवर्गणीतून पूर्ण करून घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी किंवा सदरचे काम शासनाने पूर्ण करावे असा ठराव माडग्याळ  ( ता.जत ) येथील शेतकरी मेळावा आणि पाणी परिषदेत एकमताने संमत करण्यात आला. अध्यक्षस्थानी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज होते.

सुगंधी तंबाकूचा 1 लाख रुपयाचा अवैध साठा जप्त

जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरातील निगडी कॉर्नर चौक येथील सागर टोबॅको अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर सांगली येथील अन्न व औषध प्रशासन निरीक्षक सतिश सुभाषराव हाक्के  यांनी अचानक छापा घालून १ लाख ६ हजार ५५ रुपयाची  ८७ कीलोग्राम सुगंधी तंबाखू जप्त करून दुकानाचे मालक विश्वेश्वर महादेव कोरे ( वय ४५  ) यांच्या विरोधात जत पोलिसात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही कारवाई मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली आहे. याप्रकरणी कोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही.

Wednesday, February 27, 2019

बॉयलर चिकन खाताय?


चिकनच्या शौकिनांनी बाजारातून चिकन खरेदी करताना काही दक्षता घ्यायलाच हवी, कारण यावेळी झालेलं दुर्लक्ष अनारोग्यांचं कारण ठरू शकतं. बाजारातून प्रामुख्याने बॉयलर चिकनची खरेदी केली जाते. पण जास्त मांस मिळवण्याच्या लालसेपोटी या कोंबड्यांना रसायनयुक्त औषधं आणि काही इंजेक्शनचा डोस दिला जातो. कोंबड्या लवकर मोठय़ा होण्यासाठीही काही औषधं दिली जातात. ही औषधं त्यांच्या मासांच्या गुणवत्तेवर प्रभाव टाकणारी ठरतात. म्हणूनच बॉयलर चिकनपेक्षा देशी अथवा घरी पाळलेली कोंबडी खाण्यास अधिक सुरक्षित असते असं तज्ज्ञ सांगतात. आज याविषयी काही मुद्दे जाणून घेऊ.

कलेचा असाही उपयोग


समाजातल्या वंचितगरीब घटकातल्या मुलांकडे गुणवत्ता असते. कौशल्यं असतात. पण त्यांच्या या गुणवत्तेला व्यासपीठ मिळत नाही. ही गुणवत्ता जगासमोर येत नाही. सतरा वर्षांचा मानव केडिया या मुलांच्या गुणवत्तेला व्यासपीठ मिळवून देतोय.

फंडे प्रपोजिंगचे


कोणताही दिखावा करू नका. स्वत:ला जसे आहात तसेच सादर करा. तिने तुम्हाला तुमच्या गुणांसह स्वीकारायला हवं. सोप्या पद्धतीने तिला प्रपोझ करा. कठीण शब्दफिल्मी स्टाईल टाळा. वागण्या-बोलण्यात साधेपणा आणि नम्रता ठेवा. 
थोडं फिल्मी स्टाईलने प्रपोझ करायचं असेल तर हातात लाल गुलाब घेऊन गुडघ्यावर बसा. मुलींना प्रपोझिंगची ही स्टाईल खूप आवडते. 

कसं व्हायचं श्रीमंत?

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर अठराव्या वर्षापासूनच मनी मॅनेजमेंट शिकले पाहिजे. स्वत:चं घरगाडी आणि चांगली जीवनशैली असावीअसा विचार प्रत्येक युवा करत असतो. पण फक्त विचार करून भागत नाहीप्रयत्न करावे लागतात. मनी मॅनेजमेंट करावं लागतं. विसाव्या वर्षानंतर असं नियोजन केलं तर तिशीपर्यंत तुम्ही बरेच पैसे कमवू शकता.
विसाव्या वर्षानंतर उत्पन्नातला मोठा हिस्सा वाचवायला हवा. हे पैसे गुंतवायला हवेत. आपल्या उत्पन्नातला एक हिस्सा वेगळ्या खात्यात ठेवा. आर्थिक चणचण आली तरी त्याचा वापर करू नका. ही बचत भविष्यात उपयुक्त ठरू शकेल.
कमी वयात योग्य निर्णय घ्या. विसाव्या वर्षी कुणी आर्थिक नियोजनाचा विचार करत नाही. पण या वयात फारशा जबाबदार्‍या नसल्याने पैसे वाचवणं सोपं जातं. 

संत रविदासांनी समानतेची शिकवण दिली: अगावणे


 मुचंडी येथे संत रविदास यांची जयंती उत्साहात
जत,(प्रतिनिधी)-
आपण सारेच चामड्यापासून बनलेलो आहोत म्हणूनच प्रत्येकजण समान आहोत, असा संदेश संत रविदास महाराजांनी समाजाला दिला, असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा राष्ट्रीय रविदास परिषदेचे महासचिव अशोक अगावणे यांनी जत तालुक्यातील मुचंडी येथे बोलताना केले.

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा


उन्हाळ्यात घ्या समतोल आहार
जत,(प्रतिनिधी)-
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा हळूहळू चढू लागल्याने उन्हाचा चटकाही वाढत आहे. ऋतुमानात बदल झाला तर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. मात्र शाळा, महाविद्यालय आणि कामानिमित्त रोजच बाहेर पडणार्‍यांना उन्हाळा सुसह्य करण्यासाठी समतोल आहार आणि रस्त्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळणे या गोष्टी योग्य ठरणार आहेत. शिवाय सकाळी लवकर कामाचा निपटारा करून सावलीत राहणेदेखील लाभाचे असणार आहे.

Tuesday, February 26, 2019

शुद्ध पाण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

जत,(प्रतिनिधी)-
जत शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून अनेकांनी शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाण्याचा व्यवसायच थाटला आहे. पांढरे शुभ्र, पारदर्शक, चकचकीत व थंड पाणी घरपोच, कार्यक्रमस्थळी पोहोचविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. जारचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे न पाहता दुकानदारही पाणी सर्रास वापरत आहे. हल्ली जारचे पाणी वापरण्याची शहरात फॅशन झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागात हॉटेल, पान टपरी, छोटेमोठे व्यावसायिक दुकानदार, इतकेच काय अनेक घराघरातून जारचे पाणी वापरले जाते. मात्र, हे पाणी खरंच पिण्यास योग्य आहे का? याची कोणतीच खातरजमा केली जात नाही. आज-काल लग्न समारंभ, छोट्या-मोठय़ा कार्यक्रमातून तसेच अनेकांच्या घरीही पिण्यासाठी जारचेच पाणी वापरले जाते. थंडगार जारची ३0 रुपये प्रमाणे विक्री होते. दुष्काळी भागात पाणीटंचाई असल्याने या पाण्याला मोठी मागणी आहे. यामुळे दुष्काळी पट्टय़ात अनेक ठिकाणी शुद्ध पाणी विक्री व्यवसाय सुरू आहेत.
अनेकांची नोंदणी नाही
या व्यवसायात अन्य व्यवसायांपेक्षा मोठी मिळकत असल्याने याकडे वळणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका बाटली बंद पाण्यासाठी 10 ते २0 रुपये मोजावे लागतात तर २0 लिटरचा थंड पाण्याचा एक जार ग्रामीण भागात २५ ते ३0 रुपयांत विकला जातो. साधारण १ लिटर पाण्यासाठी एक ते सव्वा रुपया खर्च पडतो. त्यामुळे शुद्ध पाणी म्हणून ग्राहक सहजपणे ते घेतात. अनेक छोट्या मोठय़ा गावातून थंडगार जारचे पाणी रोजच्या रोज घरपोच केले जाते. थंडगार जारच्या पाण्याचा व्यवसाय सध्या फोफावत चालला असून, दुष्काळी तालुक्यात ४0 पेक्षाही जास्त ठिकाणी जारचे थंड पाणी केंद्रे सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहेत. यातील अनेक केंद्रांनी शासनाकडे नोंदणीही केली नसल्याचे समजते. परिणामी तथाकथित थंड पाण्याच्या जारमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आत्ताच उन्हाळा जाणवू लागल्याने जारच्या थंड पाण्याची विक्री अधिकच वाढणार आहे. तेव्हा अनधिकृतपणे थाटलेल्या शुद्ध पाणी विक्री केंद्रांची माहिती प्रशासनाने घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. प्रशासनाने अधिकृत पाणी विक्री केंद्रांची यादीही प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Monday, February 25, 2019

एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील यांची महाराष्ट्र अभ्यास दौऱ्यासाठी निवड

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांची राज्य शासनाच्या जिल्हा परिषद सांगली आयोजित तीन दिवासाच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक विकसनशील ग्रामपंचायतींना भेट देऊन तेथील विकासाभिमूख मुद्यांचा अभ्यास करून आपल्या गावाच्या विकासासाठी सरपंचांना अभ्यास व्हावा यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या शिफारशीनुसार सांगली जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील दोन सरपंचांची निवड केली जाते त्यामध्ये जत तालुक्यातील एकुंडी व कुंभारी या ग्रामपंचायतचे सरपंच यांची निवड करण्यात आली आहे.

महिलेवर पती,सासरा,चार दीर यांनी केला सामूहिक बलात्कार

गवाल्हेर:
पत्नीला पोटगी द्यायला लागू नये म्हणून कोर्टाकडे दयावया करून पतीने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला खरा. पण त्यानंतर तिला घरी न नेता पतीने, सासर्‍याने व चार धाकट्या दिरांनी एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिला बेदम मारहाण केल्यानंतर या नराधमांनी तिच्यावर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना ग्वाल्हेर येथे घडली आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिमुरड्या सई पेटकरच्या नावावर चार विक्रम


जत,(प्रतिनिधी)-
सई पेटकर ही अवघ्या नऊ वर्षांची चिमुरडी! पण आज याच चिमुरडीने स्केटिंगवर लावणीचा ठेका धरून आणि प्रेक्षकांना धरायला लावून तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वंडर बुक, जिनिरस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिच्या या अनोख्या कामगिरीची नोंद झाली आहे.

बारावीच्या मुलीच्या अपहरणात शेगावच्या मुलाचा सहभाग


जत,(प्रतिनिधी)-
बारावीचा पेपर देऊन घरी चाललेल्या तरुणीचा सात तरुणांनी पंढरपुरातून अपहरण करण्याची घटना शनिवारी घडली. मात्र पालकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकतर्फी प्रेमप्रकरणातून करण्यात आलेल्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुटका झाली. रात्रभरच्या शोध मोहिमेतून सातार्यात मुलगी सापडली.यातील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून एक संशयीत अरोपी फरार आहे. यातील एक रोहित संजय भोसले (वय 20) हा जत तालुक्यातील शेगाव गावचा रहिवाशी आहे. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.

माडग्याळ येथे 27 रोजी शेतकरी मेळावा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या  पुर्व भागातील नागरिकांना प्रत्येकवर्षी  तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी व म्हैसाळ उपसा जलसिंचन योजना किंवा कर्नाटकातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या प्रमुख मागण्यासह इतर विविध मागण्यांसाठी  शेतकरी,ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. २७ फेब्रुवारी रोजी माडग्याळ ( ता.जत ) येथे शेतकरी मेळावा घेवून यासंदर्भातील  निर्णायक लढ्याची घोषणा करण्यात येणार आहे. अशी माहिती  चिक्कलग्गी  (ता. मंगळवेढा ) येथील भुयार मठाचे मठाधिपती तुकारामबाबा महाराज यानी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.

जतमध्ये निरंकारी मंडळाच्यावतीने स्वच्छता अभियान उत्साहात

जत,(प्रतिनिधी)-
        संत निरंकारी चँरिटेबल फौंडेशन शाखा जतच्या वतीने सदगुरु बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त जत येथील शासकिय ग्रामीण रुग्णालय, राम मंदिर परिसर, एस्.आर.व्ही.एम्.हायस्कुल मैदान, तहसिल कार्यालय मैदान इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबवण्यात  आले.शासकिय रुग्णालयाच्या  आतील भागातील सगळे वार्ड व बाहेरील संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.शिवाजी चौक ते जत कोर्ट पर्यंतचा दुतर्फा रस्त्याचीही सफाई करण्यात आली.

Saturday, February 23, 2019

जंगम समाजाला ओबीसीचे दाखले मिळावेत

(जंगम समाजास लिंगायत ऐवजी ओबीसी दाखले मिळावेत यासाठी खासदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.)
जत,(प्रतिनिधी)-
जंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत अशी मागणी सांगली जिल्हा जंगम समाज विकास संस्थेच्या जत शाखेच्यावतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन खासदार संजय काका पाटील यांना देण्यात आले. यावेळी आमदार विलासराव जगताप, डॉ. रवींद्र आरळी, तम्मा सगरे, व भाजपचे नगरसेवक प्रविण वाघमोडे आदी उपस्थित होते.

Friday, February 22, 2019

रिक्‍त पदांमुळे जतचे आरोग्य बिघडले

जत,(प्रतिनिधी)-
जत  तालुक्याच्या आरोग्याचा प्रश्‍नही फार जटील बनलेला आहे. विद्यमान क्षणी तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालयांसह नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य उपकेंद्रे असूनही डॉक्टर्सची व कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे तालुक्याचे आरोग्य बिघडले आहे.

अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत गाडगेबाबा

महाराष्ट्रात बरेच संत होऊन गेलेत, त्याच मालिकेत विदर्भातील अमरावती जिल्हय़ातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ साली श्री संत गाडगे बाबा जन्माला आले. त्यांना लहानपणी डेबू या नावाने ओळखत असे. बाबा अवती भोवतीच्या वातावरणामुळे खूप काही शिकून गेले. संत गाडगे बाबांनी स्वच्छतेला फार महत्त्व दिले. त्यांनी पाहिले की गावातील कचरा अस्त व्यस्त कुठे ही टाकला जातो. त्यामुळे लहान मोठे आजारी होऊन मृत्यूला बळी पडतात. हे पाहून बाबांची स्वच्छतेचे व्रत घेऊन स्वत:च्या हातामध्ये झाडू घेऊन गावोगावी जाऊन स्वत: साफसफाई करू लागले. बाबा साफसफाई बरोबरच गावातीललोकांना एकत्रित करून किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करू लागले. बाबाच्या या किर्तनामध्ये हजारो लोक शामील होत गेले.

गलाई बांधवांनी साजरी केली हैद्राबादमध्ये भव्य शिवजयंती

हैद्राबाद,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, जाणता राजा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची कीर्ती महाराष्ट्रबाहेरच नव्हे तर सर्व जगभर ज्ञात आहे. या त्यांच्या कार्याने भारावून गेलेल्या गलाई बांधवांनी हैद्राबाद येथे  भव्य शिवजयंती साजरी केली.

आई -वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत-सौ राणी पाटील

तासगाव (प्रतिनिधी)-
आई -वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाचा चीज लक्षात घेऊन तरुणांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सौ. राणी पाटील यांनी तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी बोलताना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार होते.

Thursday, February 21, 2019

संख येथे महात्मा बसवेश्वर पुतळयाच्या कामाचे भूमिपूजन

(नियोजित संत बसवेश्वर यांचा पुतळा)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील संख  येथील बसवेश्वर चौकात
लिंगायत धर्माचे संस्थापक व आद्य गुरू  जगदज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पूर्णाकृती भव्य असा पुतळा उभारण्यासाठी चबुतरा बांधण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन विविध मान्यवर स्वामीजींच्या हस्ते सोमवार दिनांक २५ रोजी सकाळी साडेदहा वाजता संपन्न होणार आहे. त्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन पुतळा समितीकडून करण्यात आले आहे.

बचत कशी करावी?

बचत प्रत्येकासाठी महत्त्वाची मानली जाते. कमी वयात बचत सुरू करण्याचे अनेक लाभ असतात पण उशीरा म्हणजे वयाच्या तिशीनंतर बचतीला सुरुवात केली तरी काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पुढच्या वीस वर्षांमध्ये म्हणजे वयाच्या पन्नाशीपर्यंत तुम्ही महिन्याला तीन लाख रुपये उत्पन्न मिळवू शकता. यासाठी तुम्हाला आत्तापासूनच दरमहा २0 हजार रुपये बचत करायला हवी. या बचतीचा फॉर्म्युला जाणून घेऊ ..

झोप पूर्ण होत नाही? मग हे वाचा

आपल्या शरीराने आणि हृदयाने अपेक्षेप्रमाणे काम करावं असं वाटत असेल, तर त्याला चांगली झोप हवीच. सर्वसाधारणपणे रात्रीची ६ ते ८ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कामाच्या व्यग्र वेळा, अतिरिक्त ताण, स्पर्धा आणि बदललेल्या जीवनपद्धतीमध्ये रात्रीच्या वेळी ६ ते ८ तास झोप घेणे शक्य होत नाही. परंतु त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आपलं झोपेचं चक्र टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं.
छतावरील पाणी साठवा, दुष्काळ हटवा
जत,(प्रतिनिधी)-  
छतावर पडून वाया जाणारे पाणी बोअरवेलमध्ये साठविण्याचा उपक्रम अनेक शहरांमध्ये सुरू झालेला आहे. काही नगरपालिकांनी असे पाणी साठवणार्‍यांना घरफाळ्यामध्ये काही प्रमाणात सूट सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे. या पद्धतीमध्ये घराच्या छतावर पडून वाहून ओढय़ाला किंवा नदीला मिळणारे पाणी हापशामध्ये किंवा बोअरवेलमध्ये जिरवले जाते. त्यामुळे वाया जाणार्‍या पाण्याच्या साने बोअरवेलमधील पाण्याची पातळी वर येते. हा प्रयोग अनेकांनी केलेला आहे.

बारावीची परीक्षा उत्साहात सुरू

जत,प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाची  बारावीची परीक्षा गुरूवारी सुरू झाली. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा होता. जिल्ह्यात 45 केंद्रांवर 37 हजार 349 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दहावीची परीक्षा दि. 1 मार्चपासून सुरू होत आहे. जत शहरासह तालुक्यातील उमदी आणि संख येथे परीक्षा उत्साहात सुरू झाली.

तरुणांची बेरोजगारी थांबवण्यासाठी समाजाने पुढे यावे: शंकर बटगेरी

(या बातमीला फोटो आहे. कोळी समाजाच्या वधू-वर मेळाव्याप्रसंगी वाल्मिकी प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर )
जत,( प्रतिनिधी)-
कोळी समाजातला तरुण जातीचे दाखले मिळत नाहीत म्हणून बेरोजगार  होत आहेत. अशांना समाजातील प्रतिष्ठित लोकांनी बँका,पतसंस्था काढून व्यवसाय करण्याकरता  कर्जे उपलब्ध करून द्यावीत असे प्रतिपादन  शंकर बटगेरी (सोलापूर) यांनी जत येथे  बोलताना केले.

मानवाचा अतिरेक पर्यावरणाच्या मुळावर-डाॅ. राजेंद्र लवटे

जत,( प्रतिनिधी)-
मानवाच्या अतिरेकामुळे पर्यावरणाचा -हास जलदगतीने होत असून जैवविविधता धोक्यात आली आहे असे प्रतिपादन डाॅ. राजेंद्र लवटे यांनी जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित 'इतिहास आणि पर्यावरण' या विषयावर व्याख्यान देताना केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. व्ही.एस. ढेकळे  होते.

Wednesday, February 20, 2019

रात्री आमच्या घरासमोरून का फिरतोस म्हणून मारहाण करून एकाचा खून

जत,(प्रतिनिधी)-
रात्री - अपरात्री आमच्या घरासमोरून का फिरतोस असा  जाब विचारून व इतर किरकोळ कारणावरून लोखंडी राँड व काठीने बेदम मारहाण करून अविनाश शिवाजी  साळुंखे ( वय ३० रा.  विठ्ठल नगर ,तुरेवाले प्लाँट , जत ) या सेंट्रींग कामगाराचा निर्घृणपणे खून केल्याच्या आरोपावरून पृथ्वीराज शंकर निकम ( वय १९ ) , विकास  उर्फ सोनू बाळासाहेब भोसले ( २६ ) , आकाश उर्फ मोनू बाळासाहेब भोसले ( २४ ) सर्व राहणार विठ्ठल नगर , तुरेवाले प्लाँट  जत या तीन  जणांच्या विरोधात  गुन्हा दाखल करून जत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे . ही घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी मयत अविनाश याची पत्नी कविता अविनाश साळुंखे  ( वय २५ ) हिने फिर्याद  दाखल केली आहे.

नोकरी शोधा

1)' केंद्रीय लोकसेवा आयोग - यूपीएससी - नागरी सेवा - आयएएस, आयपीएस - २८ प्रकारची पदे व इंडियन फॉरेस्ट सेवा पदांकरिता पूर्वपरीक्षा - २ जून २0१९ रोजी घेतली जाणार असून, ऑनलाईन अर्ज १८ मार्च २0१९ पयर्ंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती यूपीएससीडॉटजीओव्हीडॉटइन येथे उपलब्ध.

जिल्हा स्तरीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार गुण

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणार्‍या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना पहिले 3 क्रमांक मिळविणार्‍या खेळाडूंना 5 गुण तर विभागीय स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंना 10 गुण या पद्धतीने क्रीडा सवलतीचे गुण दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दिले जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

सांगली जिल्हाधिकारीपदी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली,(प्रतिनिधी)-
सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. अभिजीत चौधरी यांची नियुक्ती झाली आहे. वि. ना. काळम यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य शिबिरासाठी राबणाऱ्या आशा सेविकांना आता मानधन

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदने आरोग्य महाशिबिरात सहभागी होणाऱ्या आशा स्वयंसेविकांंना जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीतून दीडशे रुपये देण्याचा ठराव नुकताच आरोग्य समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. यामुळे साहजिकच आशा स्वयंसेविकांना दिलासा मिळाला आहे .याबाबत महाराष्ट्र आशा ,गटप्रवर्तक युनियन सांगली  (CITU संलग्न) यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने आशा स्वयंसेविकांना न्याय मिळाला आहे.

Tuesday, February 19, 2019

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संत रोहिदास,शिवजयंती साजरी

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संत रोहिदास जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जत येथील बुद्धविहार येथे हा कार्यक्रम पार पडला.

दारूला पैसे दिले नाहीत म्हणून वृद्धावर हल्ला

जत,(प्रतिनिधी)-
 दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून राहूल दत्तात्रय काळे ( वय २९ रा.मेंढपाळ नगर जत ) या गावगुंडाने  धारदार चाकूने हल्ला करून विलास विठोबा  देवकते ( वय ५० रा.देवकाते काँलनी जत ) या वयोवृद्ध नागरिकांस गंभीर जखमी केल्याच्या आरोपावरून काळे याच्या विरोधात स्वतः देवकाते यानी सोमवारी रात्री उशिरा जत पोलीसात  फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान देवकाते काँलनी परिसरात घडली आहे.

आंतरजातीय विवाह अनुदान मागणीत सातत्याने वाढ


जत,(प्रतिनिधी)-
आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जिल्ह्यातून  गेल्या दोन वर्षात सातत्याने वाढ होत आहे. गेल्यावर्षी 124 दाम्पत्यांनी प्रस्ताव दिला होता. यावर्षी 118 दांपत्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे आले आहेत. गेल्या पाच वर्षात 516 लाभार्थी दांपत्यांना 2.52 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

साडेसतरा हजार किंमतीचा गांजा जप्त

जत,(प्रतिनिधी)-
माडग्याळ (ता.जत) जवळील जत्तीवस्तीवरील श्रीशैल सत्यपा माळी (वय 65 वर्षे) यांच्या लसणाच्या पिकाच्या शेतात बेकायदा बिगरपरवाना गांजाची झाडाची बेकायदा लागवड केल्याचे आढळून आले. याची माहिती उमदी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा टाकून सुमारे साडेसतरा हजार रुपयांचा गांजा जप्त केला.

जत तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था

मार्गदर्शक,देखरेखीचा अभाव;क्रीडा क्षेत्रात प्रचंड संताप
जत,(प्रतिनिधी)-
जतच्या सांगली मार्गावर उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून याठिकाणी देखरेखीला रखवालदार तर नाहीच,पण मार्गदर्शकाची पदेही भरली नसल्याने मैदानी खेळात आघाडी घेतलेल्या जतच्या युवकांना यशापासून दूर व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे तालुका क्रीडाधिकारीपासून ते राज्याच्या क्रीडा उपसंचालकापर्यंतच्या पदावर चक्क जतचीच माणसे विराजमान आहेत, पण या लोकांना आपल्या तालुक्याकडे आणि इथल्या युवकांच्या भवितव्याकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे जत तालुक्यातल्या क्रीडा क्षेत्रात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Monday, February 18, 2019

शिक्षणाच्या खासगीकरणाला विरोध करणार:आमदार कपील पाटील

जत,( प्रतिनिधी)-
शिक्षणाचे कंपनीकरण करण्याचा डाव सरकारने आखला आहे. त्याद्वारे बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. हे हाणून पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षक आमदार कपील पाटील यांनी केले. शिक्षक भारती संघटनेच्यावतीने येथे झालेल्या अधिवेशनात आ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार अनिलराव बाबर होते. यावेळी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्‍या गुरूजनांना ‘सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

जतमधल्या दोघा चंदन तस्करांना कर्नाटकात अटक

जत,(प्रतिनिधी)-
कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर चंदन भरून जत तालुक्यातून बागलकोट जिल्ह्याकडे जाताना ऐगळी पोलिसांनी सापळा रचून मारुती कारवर छापा टाकून 2 क्‍विंटल चंदन जप्त केले आणि दोघा चंदन तस्कारांच्या मुसक्या आवळल्या.

वीस वर्ष पत्रकारीता केलेल्या पत्रकारांना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करा -सादिक खाटीक

आटपाडी,( प्रतिनिधी )-
 शहर,ग्रामीण भागात वीस वर्षे मानधनावर काम केलेल्या पत्रकाराना कसल्याही जाचक अटी न लावता प्रति महीना दहा हजार रुपये पेन्शन सुरू करण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांनी केली आहे .   
   खरसुंडी येथील श्री . जोगेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेच्या सभागृहात झालेल्या आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत ते बोलत होते .अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नागेश गायकवाड हे होते .     

जात्यावरच्या ओव्या,भूपाळ्या राहिल्या फक्त पुस्तकात!


जत,(प्रतिनिधी)-
पूर्वीची घरातील मोठी माणसे पहाटे लवकर उठायची. कोंबडा आरवला की, त्यांची पहाट व्हायची. त्याकाळी घरातल्या आजीबाईकडे कुठले घड्याळ असायचे? पण त्या नेमाने ठरल्या वेळेत उठायच्या. जाते मांडून पायलीभर ज्वारी तासाभरात दलून संपवायची. पहाटेची निरव शांतता, जात्याची मंजूळ घरघर आणि घरातल्या आजीच्या कंठातून निघणार्‍या सुमधूर ओव्या सगळ्या घरादाराची काने तृप्त करायच्या. मात्र आज असे काहीच चित्र दिसत नाही. आधुनिक जीवनशैली, एकल कुटुंब पद्धतीत वाढ आणि उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे, या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे ओव्या,भुपाळ्या हद्दपार झाल्या आहेत.

'व्हॉट्स अँप' छंद बनला प्रेमाचा गुलकंद


जत,(प्रतिनिधी)-
प्रेम या अडीच अक्षराकरित चिठ्ठी, हातवारे, मित्रांची मदत यासह अनेक गोष्टींचा आधार घेत प्रेमभावना व्यक्त करण्यात येत होत्या. याबाबी आता इतिहास जमा होऊ लागल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात परिभाषेचा सरळ मार्ग आता अँन्ड्रॉईड मोबाईल झाला आहे. इंटरनेट सेवेमुळे 'व्हॉट्स अँप' हा छंद प्रेमीयुगलांसाठी दुाध शर्करा योग ठरत आहे. मदतनीस ठरणार्‍या या मोबाईल संचामुळे प्रेमभावना सोडा, चक्क प्रेमाचा गुलचंद चाखण्यासारखा आनंद प्रेमविरांना येत आहे. अपेक्षित असलेले पोस्ट पाहून गालातल्या गालात दुखणे हसणारे प्रेमी चार चौघात सुध्दा देह भान विसरत चालल्याचे दिसून येते. मात्र या प्रकाराला आळा घालण्यात पालकवर्ग अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक बांधिलकी असणार्‍या नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जि.प.च्या अनेक शाळांची वीज जोडणी 'कट'


जत,(प्रतिनिधी)-
व्यावसायिक दराची वीज त्यातही बिल भरण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. परिणामी वीज बिल थकू लागले आहेत. जि.प.च्या अनेक शाळांची वीज कट करण्याचा सपाटा महावितरण ने सुरु केला आहे. या कारवाईतून वाचण्यासाठी वीज बिलाची रक्कम 'अँडजेस्टमेंट' करताना मुख्याध्यापकांच्या मात्र नाकीनऊ येऊ लागले आहेत. 

Sunday, February 17, 2019

स्वप्नांच्या मागे धावणं हा मानवी मनाचा धर्म: पोतनीस

(जत येथील दत्त क्लासेसच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमात प्रमोद पोतनीस मार्गदर्शन केले.)
जत,(प्रतिनिधी)-

युवकांनी स्वप्नांच्या मागे धावायला हवं
.त्यासाठी कष्ट,जिद्द, चिकाटीची जोड हवी. यातूनही यश मिळालं नाही तरी खचून न जाता दुसर्या स्वप्नांच्या मागे धावायला हवं. गप्प बसणं हा मानवी मनाचा धर्म नाही, असे प्रतिपादन रामराव विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक प्रमोद पोतनीस यांनी जत येथील न्यू दत्त क्लासेसच्या दहावी-बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांच्या निरोप आणि शुभेच्छा समारंभात बोलताना केले.
     न्यू दत्त क्लासेसच्या दहावी-बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्याचा समारंभ नुकताच शिवनगर येथील क्लासेसच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी जत हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. म्हेत्रे होते. यावेळी बोलताना श्री.पोतनीस म्हणाले की, आज ज्ञानाची कक्षा रुंदावली आहे. तसेच प्रलोभनेही वाढली आहेत. त्यामुळे युवकांनी सतर्क राहून जिद्दीने स्वत:चे करिअर करायला हवे. यासाठी कष्ट,चिकाटीही महत्त्वाची आहे.

पुलवामातील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा येळवीत निषेध


जत,(प्रतिनिधी)-
येळवी ग्रामपंचायत व ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्था यांच्यावतीने काश्मीर मधील पुलवामा येथे  झालेल्या अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व  भ्याड अतिरेकी हल्ल्याचा तसेच पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी  'भारत माता की- जय', 'वीर जवान अमर रहे-अमर रहे' अशा घोषणा देण्यात आल्या , त्याचबरोबर  पाकिस्तानचा निषेध म्हणून 'पाकिस्तान मुर्दाबाद-मुर्दाबाद' अशाही घोषणा देवून  निषेध करण्यात आला.

Saturday, February 16, 2019

हणमंत बामणे यांचे मंडलाधिकारी परीक्षेत यश

जत,(प्रतिनिधी)-
    जत तालुक्यातील बसर्गी येथील हणमंत ईश्वर बामणे यांनी मंडळ अधिकारी परीक्षेत जिल्ह्यामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे.शिक्षक ते मंडलाधिकारी असा त्यांचा प्रवास इतरांना मार्गदर्शक ठरणार आहे.