Saturday, December 1, 2018

जत तालुक्यात दुष्काळाच्या उपाययोजना चालू करा: सचिन मदने


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका हा खरीप व रब्बी हंगाम वाया गेल्यामुळे अडचणीत सापडला असून तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने जत तालुका दुष्काळ जाहीर करून तब्बल एक महिना झाला तरी तालुक्यातील शेतकर्यांना कोणत्याही सवलती दिल्या नाहीत.
येत्या आठ दिवसात दुष्काळाच्या सर्व सोयी सवलती द्याव्यात, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भटक्या विमुक्त जाती आघाडीचे तालुकाध्यक्ष सचिन मदने यांनी दिला.
त्यांनी म्हटले आहे की, शेतामध्ये पिक नसल्याने चार्यासाठी जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील नागरिकांना रानोमाळ भटकंती करण्याची पाळी आली आहे. महिनाभरापूर्वी शासनाने जत तालुका दुष्काळ जाहीर केला असून दुष्काळासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहेत. मात्र त्यातील एक ही योजना आतापर्यंत तालुक्यातील शेतकर्यांना  मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
अनेक शेतकरी आपली जनावरे कवडीमोल किंमतीला विकून टाकत आहेत. एकाही गावाला प्रशासनाने अद्याप टँकर सुरू केलेला नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांना तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात अशी आमची मागणी आहे. गेल्या वर्षभरापासून विहिरीला पाणी नसल्याने अनेक इलेक्ट्रिकल मोटारी बंद आहेत, तरीही वीज वितरण कंपनीने मोठ्या प्रमाणात वीज बिले दिली आहेत. संपूर्ण वीज बिल शासनाने भरावे, मागेल त्याला रोजगार हमीची कामे द्यावीत, अशा अनेक मागण्या शासनाने येत्या आठ दिवसात तालुक्यातील जनतेला द्याव्यात अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढू असा इशारा त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment