जत,(प्रतिनिधी)-
जत, कवठेमहांकाळ, खानापूर,
आटपाडी, पलूस आणि कडेगाव हे दुष्काळी तालुके
म्हणून शासनाने जाहीर केले. मात्र, अद्यापही
मदतीचा कसलाच हातभार मिळताना दिसत नसल्याने संताप
व्यक्त होत आहे. दुष्काळ तीव्र असूनही ही वागणूक
मिळाल्याने ‘भाळी दुष्काळाच्या झळा; तरी शासनाला नाही कळवळा’
असे म्हणायची वेळ आली आहे.
जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या अत्यंत भिन्न असून
दुष्काळ पाचवीला पुजलेला पहायला मिळतो. यंदाही या भागावर वरुण राजाने अवकृपा
केली आहे. ना मान्सून ना परतीचा पाऊस. या भागात पाऊस
झालाच नाही. त्यामुळे खरीप आणि रब्बी पिकांवर अवलंबून असणारी चाळीस ते पन्नास
टक्के शेती यंदा पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम पूर्ण
वाया गेले आहेत. उरलेला ऊस, द्राक्षे, फळपिके,
भाजीपाला ही पिकेही पाण्याअभावी मोठ्या
संकटात सापडली आहेत. तालुक्यातील सर्व मोठे तलाव, पाझर तलाव व छोटे तलाव कोरडे पडले आहेत. जूनमध्ये असलेला पाणीसाठा
उपसा आणि बाष्पीभवन यामुळे संपून गेला आहे.
यंदा एक दोन वेळा पडलेला रिमझिम हलका पाऊस वगळता पाऊस
झालाच नाही. यंदा कोणत्याच पावसात ताली, बांध भरले नाहीत.
रानात पाणी साचले नाही. जलसाठे झालेच नाहीत. उलट भूजलपातळी अत्यंत खालावली आहे.
कूपनलिका खोदाईचा नुसताच धुरळा उडत आहे. उसपीक वाळू लागले आहे. छाटणी केलेल्या
द्राक्षबागा अखेरच्या घटका मोजत आहेत. या भागातील ऊस आणि
द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट संभवत आहे. भाजीपाला उत्पादन अडचणीत आहे.
त्यातूनही जगविलेल्या फळभाज्यांना दर नाही.
शासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment