Tuesday, January 1, 2019

वंचित समाज आमदार जगतापांना धडा शिकवेल: सौ. बन्नेनवर

जत,(प्रतिनिधी)-
पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या लाटेवरती स्वार झालेले आमदार विलासराव जगताप व त्यांच्या नगरसेवकांना जत तालुक्यातील वंचित समाज आगामी  निवडणुकीमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवून देईल, असा इशारा जत नगर पालिका  नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांनी दिला.

       काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीने गांधी चौक  येथे नगर पालिकेने मागील वर्षभरात केलेल्या विकास कामासंदर्भात  आयोजित केलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार, नगरसेवक इक्बाल गवंडी,भूपेंद्र कांबळे, लक्ष्मण एडके, साहेबराव कोळी,स्वप्नील शिंदे, निलेश बामणे,गायत्रीदेवी शिंदे, नामदेव काळे व श्रीकांत शिंदे, मुन्ना पकाली,उत्तम चव्हाण, बसवराज पाटील  आदीजण यावेळी  उपस्थित होते.
     चार दिवसापूर्वीच भाजपचे नगरसेवक व आमदार विलासराव जगताप यांनी शहरात सभा घेऊन आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. खोटे बोल पण रेटून बोल म्हणणाऱ्या या मंडळीवर शहरातील जनता कधीही विश्वास ठेवणार नाही. आमदार विलासराव जगताप हे मोदींच्या लाटेवर स्वार होऊन निवडून आले आहेत. राजकीय स्वार्थासाठी वंचित समाजाला त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची जागा त्यांना  दाखवून देण्यात येईल, असा इशारा  नगराध्यक्ष बन्नेनवार यांनी दिला आहे .
माजी नगराध्यक्ष इक्बाल गवंडी यावेळी बोलताना म्हणाले, मी मागील  तीस वर्षापासून  शहरातून निवडून येत आहे. माझ्या प्रभागातील मतदार माझ्यावरती अविरतपणे प्रेम करत आहेत.  विरोधकांनी माझ्या राजकारणाची काळजी करू नये ज्यांना अविश्वास ठराव दाखल करून उपनगराध्यक्ष पदावरून काढून टाकले आहे .त्यांनी माझ्यावर आरोप केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
 बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे यावेळी बोलताना म्हणाले आमदार व त्यांच्या  नगरसेवकांनी नगर परिषदेच्या विरोधात गमतीजमती सुरू केले आहेत . त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून आत्मविश्वास ढळत चालल आहे. शहरात आमदार फंडातून पाच लाईटचे बल लावण्याखेरीज त्यांनी एक दमडीचाही निधी दिला नाही. काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी पळवून लावले , त्यामुळे विकास खुंटला आहे .  जत शहर व तालुक्यात कुणाची गुंडगिरी सहन केली जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
 स्वच्छता व आरोग्य सभापती लक्ष्मण एडके म्हणाले. भाजपचे नगरसेवक कारभार चांगला करू देत नाहीत . त्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शहराचा विकास खुंटला आहे.आगामी  चार वर्षाचा नवा अजेंडा आम्ही  तयार केला असून त्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात चांगला विकास करून  शहराचा  कायापालट करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
  काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुजय  शिंदे म्हणाले,  'विश्वासाने शहरातील जनतेने  नगरपालिका ताब्यात  दिली आहे .त्या विश्वासाला पात्र  राहून  प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न नगरसेवक करत आहेत.१७ कोटी ८८  लाख रुपये शिल्लक आहेत असा आरोप आमदार व भाजपा नगरसेवक करत असले तरी ती रक्कम  तीन वर्षापासून शिल्लक आहे . मार्च अखेर ते सर्व पैसे खर्ची पडतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.'

 जत नगर पालिकेतील सत्ताधारी व विरोधी  नगरसेवकानी मागील आठ  दिवसांत एकाच चौकात जाहीर सभा घेवून एकमेकांचे वाभाडे काढले . त्यामुळे जनतेची करमणूक झाली खरी,परंतु  पालिकेतील खरी परिस्थिती काय आहे याचा उलघडा या सभेतून होणे आवश्यक होते, ते मात्र दिसून आले नाही.

No comments:

Post a Comment