जत,(प्रतिनिधी)-
शेतकर्यांना कृषिसल्ला अथवा योजना सांगण्यासाठी कृषी विभागाचे
कर्मचारी गावात भेटत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या असून शासनाने
या कर्मचार्यांसाठी ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रीक उपकरण बसवावे,
अशी मागणी होत आहे.
अलिकडच्या काळात कृषी कर्मचार्यांचा शेतकर्यांशी असलेला संबंध
तुटलेला आहे. वास्तविक कृषी विद्यापीठाचा सल्ला गावशिवारापर्यंत
पोहचवणे आणि सरकारी योजना बांधावर नेण्याचे काम या कृषी कर्मचार्यांचे आहे. मात्र बहुतांश कर्मचारी ग्रामपंचायत किंवा
गावाकडे फिरकत नाहीत. याबाबत सरपंचांनी थेट कृषी आयुक्तांकडे
तक्रारी दाखल केल्या आहेत. या सरपंचांचे म्हणणे असे की,
कृषी सहाय्यक किंवा पर्यवेक्षक कुठून येतात, कुठे
जातात, शिवारात अथवा ग्रामपंचायतमध्ये कुणाला भेटतात,याची काहीच कल्पना गावप्रमुख म्हणून आपल्याकडे अजिबात असत नसल्याची तक्रार
करण्यात आली आहे.
सध्या भयानक दुष्काळी परिस्थिती असल्याने
शेतकर्यांना त्यांच्या मार्गदर्शन आणि सल्ल्याची शेतकर्यांना गरज आहे. शासनाने कोणकोणत्या सवलती जाहीर केल्या
आहेत. त्याची रुपरेषा काय आहे, याबाबत शेतकर्यांना माहिती होण्याची गरज आहे. अजूनही 50 टक्के शेतकरी अशिक्षित आहेत. कन्नड भाषेची अड्चण आहे.
त्यामुळे कृषी कर्मचार्यांची गावागावातल्या शेतकर्यांना गरज आहे. मात्र काही मोजके कर्मचारी वगळता बहुतांश
कर्मचारी पाट्या टाकण्याचेच काम करीत आहेत. फोन केल्यावर काही
तरी थातूर-माथूर उत्तरे दिली जातात. हीच
मंडळी ग्रामपंचायतीत आल्यास कृषी विभागाच्या योजना तसेच सल्ले मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे ग्रामपंचायतीत बायोमेट्रीक उपकरण बसवण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment