प्रशासनाची चालढकल;जत तालुक्यात फक्त 9 गावांना टँकर
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत
असताना पिण्याच्या पाण्याचे टँकर देण्याबाबत प्रशासन चालढकल करत असल्याने नागरिकांना
पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सध्या
जत तालुक्यात फक्त 9 गावे आणि 68 वाड्यावस्त्यांवर
10 टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे.
मात्र अनेक गावे तहानलेली असताना प्रशासन चालढकल करीत असल्याने संताप
व्यक्त केला जात आहे.
पाऊस समाधानकारक झाला नसल्याने तालुक्यातील
खरीप आणि रब्बी पूर्णपणे वाया गेला आहे. या
पार्श्वभूमीवर प्रशासनाने पीक पाहणी करून सांगली जिल्ह्यातील
246 गावातील 50 टक्केंपेक्षा कमी पैसेवारी असल्याचे
जाहीर केले आहे. राज्य सरकारने जिल्ह्यातील जतसह आटपाडी,
खानापूर, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातील सर्व
गावात आणि अन्य तालुक्यातील दहा मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र मागेल त्याला पाण्याचा टँकर देण्याचे आदेश असताना टँकर सुरू करण्याबाबत
बेफिकीरता दाखवली जात आहे.
जत तालुक्यातील डफळापूर परिसरातील गावांसह
कुंभारी,कोसारी,प्रतापपूर, शेगाव, बनाळी आदी पंधरा-सोळा गावांमध्ये
म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले आहे,मात्र दक्षिणेला जिरग्याळ,एकुंडी, वज्रवाड, गुगवाड,उमराणी परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय पूर्वभागातील गावांनाही टंचाईची झळ बसली आहे.प्रशासनाने तातडीने मागेल त्याला पाण्याचा टँकर द्यावा व लोकांची परवड थांबवावी,
अशी मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यात 41 गावांना पाण्याचा टँकर
सध्या जिल्ह्यात जतसह आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यातील 41 गावांना तसेच सुमारे
225 वाड्यावस्त्यांना 26 टँकरच्या माध्यमातून पाणी
पुरवठा केला जात आहे. जत तालुक्यात 9 गावे
आणि 68 वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा सुरू आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातल्या 8 गावांना, 30 वाड्यावस्त्या,तासगाव 2 गावे आणि
5 वाढ्यावस्त्या, खानापूर 6 गवए, 3 वाड्यावस्त्या आणि आटपाडी तालुक्यातील
16 गावे आणि 122 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणी
पुरवठा सुरू आहे.
No comments:
Post a Comment