Monday, November 5, 2018

गरिबांची भाकरी महागली

ज्वारी क्विंटलमागे 800 ते 1000 रुपयांनी महाग
जत , (प्रतिनिधी)-
गेल्या काही दिवसांत बाजारात ज्वारीची आवक कमी झाल्याने दर भडकले आहेत. किरकोळ विक्रीत किलोमागे तब्बल दहा ते बारा रुपये अधिक मोजावे लागत आहेत. 18 ते 20 रुपये किलोने मिळणारी ज्वारी आजच्या घडीला 30 ते35 रुपयांना मिळत आहे. साहजिकच भाकरीवर अवलंबून असणार्‍यांनी हा दर पाहून डोक्याला हात लावला आहे. गरिबांची ज्वारी महागल्याने त्याचा परिणाम अन्य धान्यावर झाला असून त्यांचेही दर भडकत आहेत. 15 रुपये किलोने मिळणारी बाजरीदेखील 25 रुपयांवर पोहचली आहे.
पाऊस न झाल्याने रब्बी ज्वारीला मोठाच फटका बसला असून हा हंगाम वाया गेला आहे. मात्र त्याचा परिणाम बाजारावर दिसू लागला असून धान्याचे दर भडकत आहेत. याचा सगळ्यात मोठा फटका ज्वारीला बसला आहे. गेल्या पंधरा दिवसांत बाजारात ज्वारीची आवक कमी झाल्याने ज्वारी क्विंटलमागे तब्बल 800 ते 1000 रुपयांनी महागली आहे. यंदा ज्वारीचे पीक  पावसाअभावी जळून गेल्याने शेतकर्‍यांनी जुनी ज्वारी बाहेर काढलीच नाही. साहजिकच यामुळे ज्वारीची दर भडकले आहेत. मागे चार वर्षांपूर्वी ज्वारीचा किलोमागे दर पन्नास ते साठ रुपयांवर पोहचला होता. आता त्याचीच पुनर्रावृत्ती होईल की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ज्वारी हे पश्‍चिम महाराष्ट्रासह  मराठवाडा,विदर्भातील प्रमुख अन्न आहे. अलिकडच्या काही वर्षात ज्वारीच्या लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. अनिश्‍चित दर, पावसाचा अभाव आणि मागणीचे घटते प्रमाण आदी कारणांमुळे ज्वारीचे पौष्टीक, पचनास हलकी असलेली ज्वारी औषधी गुणधर्माची आहे. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादनाचे विकार कमी होतात. रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते. हृदयासंबंधीत आजारातही ज्वारी उपयोगाची आहे. याशिवाय धान्याबरोबरच जनावरांना चाराही मिळतो. अशा सर्वदृष्टीने फायद्याच्या असलेल्या ज्वारीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. गरिबाचे धान्य म्हणून याकडे पाहिले जात असले तरी याला हमीभावाने दर मिळायला हवा,तरच शेतकर्‍यांनाही याचा फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment