Thursday, November 29, 2018

'शिक्षक भारती'चे धरणे आंदोलन स्थगित

गटशिक्षणाधिकारी यांचे लेखी आश्वासन
जत,(प्रतिनिधी)- 
जत तालुका प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने  जत पंचायत समितीसमोर प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी १ डिसेंबर रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने यांनी संघटनेशी चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न मुदतीत सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले.
त्यामुळे धरणे आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आल्याचे तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
          गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा शिक्षकांची सेवापुस्तक अद्ययावत करण्याचा प्रश्न  रखडला आहे. केंद्रस्तरीय कॅम्प लावण्यासाठी एक कृती आराखडा तयार करून जानेवारी पासून केंद्रस्तरीय कॅम्पचे आयोजन करून प्रश्न निकाली काढू,असे सांगितले. जत शिक्षण विभागात रिक्त असणाऱ्या लिपिकांच्या पदाबाबत वरिष्ठ कार्यालयास माहिती पाठवली आहे.  आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत  बदलीने जत तालुक्यातील शिक्षकांच्या वेतन फरक काढण्याची कार्यवाही सुरू आहे. ज्यांची वैद्यकीय बिलं व वरीष्ठ वेतनश्रेणी फरक बिले दिली नाहीत, ती तात्काळ देण्यात येतील,असेही गटशिक्षणाधिकारी श्री. जगधने यांनी सांगितले.
      शिक्षक भारती अध्यक्ष दिगंबर सावंत म्हणाले, की ,गटशिक्षणाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने यावेळी एक दिवशीय धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत. प्रश्न संपण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करुन आमच्या मागण्या पूर्ण करुन घेऊ, परंतु प्रलंबित प्रश्न  सुटले नाहीत तर  शिक्षक भारती पुन्हा आंदोलन करेल.
       यावेळी दिगंबर सावंत, शौकत नदाफ,अविनाश सुतार,भाऊसाहेब महानोर, मल्लया नांदगाव , दशरथ पुजारी, बाळासाहेब सोलनकर, विनोद कांबळे यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment