Tuesday, November 27, 2018

दुष्काळ संकट नव्हे संधी;तातडीने उपाययोजना करण्याची मागणी


रोजगार व परिसर विकास करण्याची नामी संधी
 जत,(प्रतिनिधी)-
राज्यात निम्म्यापेक्षा जास्त तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या संकटाशी सामना करण्याचा प्रयत्न होत असला तरी तो फारच अपुरा आहे. दुष्काळ हे संकट नसून संधी आहे. यानिमित्ताने परिसरातील लोकांना रोजगार आणि विकास करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सरकार आणि प्रशासनाने वेळ न दवडता या संधीचा उपयोग करायला हवा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सध्या जत तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातल्या जनतेला, शेतकर्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची,जनावरांच्या चार्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांसह अनेकांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थिती सगळ्यांच्याच नजरा या शासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. सरकराही काही पडणार नाही, अशी वल्गना करीत आहे,पण प्रत्यक्षात लोकांच्या हाती काहीच पडलेले नाही. पाण्याचे टँकर सुरू नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी अख्खा दिवस घालवावा लागत आहे. सरकारने तातडीने निर्णय घेऊन पाणी पुरवठा व्यवस्थेसह रोजगार हमीची कामे सुरू केल्यास अनेक गोष्टी साध्य होणार आहेत.
तालुक्यातील तलावांमध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साठला आहे. रस्ते,पाणंद, विहिरी अशी कामे सुरू केल्यास परिसराचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. कृषी विभाग पाणलोट योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलयुक्तशिवार अशा विविध योजनांच्या माध्यमातून गावात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करता येण्यासारखी आहेत. याशिवाय याच माध्यमातून चारा उत्पादन, पिके, फळबागा वाचवण्यासंदर्भात प्रयत्न व्हायला हवेत. याचा लाभ थेट शेतकर्यांना होणार आहे.
या दुष्काळाच्या निमित्ताने गाव परिसरात मृद-जलसंधारण,पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन अशी अनेक कामे करून लोकांना रोजगार आणि परिसराचा विकास करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे लोकांचे स्थलांतर थांबणार आहे. सरकारने तातडीने दुष्काळी उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी होत आहे.



No comments:

Post a Comment