Saturday, November 24, 2018

दुष्काळी जनतेला आधार देण्याचे काम विक्रम फाऊंडेशनने केले-दिलीप पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 विक्रम फाऊंडेशनच्यावतीने विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील दिव्यांगांसाठी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचबरोबर दुष्काळी जनतेला आधार देण्याचेही काम केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले. येथील विक्रम फाउंडेशन व फेलोशिप ऑफ द हॅन्ङीकॅप्ड आयोजित केलेल्या दिव्यांगांसाठी मोफत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
 यावेळी आमदार मोहनराव कदम, पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, पी. एम. पाटील, बाबासाहेब कोडग, माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, आप्पासाहेब बिरादार, राजाराम सावंत, अभिजित चव्हाण, शुभांगी बनेनावर, आप्पा मासाळ, रवींद्र सावंत,महादेव दुधाळ,नाथा पाटील, अर्चना पाटील, युवराज निकम, संतोष पाटील आदी उपस्थित होते. दिलीप पाटील म्हणाले विक्रम फाउंडेशनने जत तालुक्यात दिव्यांगासाठी कार्यक्रम घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे ज्या लोकांना आधार पाहिजे त्यांना आधार मिळत नाही यासाठी ही संस्था काम करत आहे. सहाशे पेक्षाही जादा दिव्यांगांनी हजेरी लावली असून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ही संस्था यापुढे प्रयत्न करणार आहे. आमदार मोहनराव कदम म्हणाले विक्रम फाउंडेशनने जत सारख्या दुष्काळी तालुक्यात दिव्यांगासाठी चांगला आधार देऊन त्यांना पायावरती उभे करण्याचे काम केले आहे यापुढे आम्ही विक्रम फाऊंडेशनच्या मतीसाठी एक पाऊल पुढे येऊ.
काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले,तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या उपयोगासाठी या दिव्यांग शिबिराचे आयोजन केले असून सर्वांनीच या शिबिराचा उपयोग करून घ्यावा. तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडला असतानाही आमदार, खासदार यांना मात्र याचे कोणतेही गांभीर्य नाही. ते वेगळ्याच कार्यक्रमात व्यस्त असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य विक्रम सावंत म्हणाले, जत तालुक्यातील 600 दिव्यांग व्यक्तींनी नाव नोंदणी केली असून त्यातील 250 दिव्यांगांना जाग्यावरच वस्तू देण्यात येणार आहेत, त्यामुळे या वस्तूचा उपयोग करून दिव्यांग आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विक्रम फाउंडेशन या तालुक्यात काम करत असल्याचे सांगून तालुक्यात 138 बचत गट निर्माण केले आहेत या बचत गटांनाही वेगवेगळे व्यवसाय तालुक्यात सुरू करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. प्रास्ताविक व आभार मोहनराव कुलकर्णी यांनी मानले.

No comments:

Post a Comment