Monday, November 19, 2018

जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाऊस; द्राक्षबागांना फटका बसणार


जत,(प्रतिनिधी)-
 वातावरणात अचानक बदल होऊन थंडी गायब होऊन उष्मा वाढला आहे. याचा परिणाम की काय; रविवारी आणि सोमवारी या दोन दिवसांत पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी काही क्षणच; पण जोरदार पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी रिमझिम बरसला. सोमवारी सायंकाळी सांगलीतही बारीक पावसाला सुरुवात झाली होती. रविवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची चिन्हे आहेत. तामिळनाडू आणि केरळ किनारपट्टीलागजवादळाचा तडाखा बसल्यानंतर या वादळाचा परिणाम एकूण वातावरणावरहीझाल्याचे दिसत आहे. एखाद- दुसरा बोचर्या थंडीचा दिवस वगळता सतत उष्मा वाढत असल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आच्छादले होते. सायंकाळी सांगली आणि परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. काहीवेळी मेघगर्जनाचा आवाजही कानावर पडला. पर्जन्यमान्य कमी असल्याने जिल्ह्यातली खरीप पिके उगवल्यानंतर वार्यावर उडून गेली तर रब्बीची लागणच होऊ शकली नाही. आता अचानक पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली असली तरी याचा शेतीच्या बाबतीत उपयोग नाही. परंतु या पावसाने द्राक्षबागायतदारांची झोप उडवली आहे. फुलोर्यावर असलेल्या बागांना आणि मणी तयार होऊन घड आकाराला येऊ लागलेल्या बागांचेही या पावसाने मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घडांमध्ये पाणी साचले तर घडकुज होण्याची भीती आहे.

No comments:

Post a Comment