Wednesday, November 28, 2018

जिल्हा बँकेतही मिळणार अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज


जत,(प्रतिनिधी)-
 शेतकर्यांची, सामान्यांची बँक म्हणून ओळख असणार्या जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील; तसेच शहरातील तरुणांसाठी प्रगतीच्या वाट खुल्या करणारे पाऊल टाकले असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मंजूर लाभार्थींना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याबाबतचा करार दोन दिवसांत केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली. सरकारने योजनेची पुनर्रचना केली; परंतु राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि व्यापारी बँकांतून कर्ज मिळत नसल्याने तरुणांमध्ये उदासीनता होती. ही उदासीनता दूर करण्याचे काम बँकेचे अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या माध्यमातून होत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक विलासराव शिंदे, सुरेश पाटील, सी. बी. पाटील, विशाल पाटील, प्रताप पाटील, गणपती सगरे, बाळासाहेब होनमोरे, बी. के. पाटील, सिकंदर जमादार, कमल पाटील, श्रद्धा चरापले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास कर्ज देण्यास राष्ट्रीयीकृत बँका राजी होत नसल्याचा प्रकार समोर आला होता. ही बाब लक्षात आल्याने बँकेचे उपाध्यक्ष देशमुख यांनी याबाबत सर्जेराव पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्जेराव पाटील यांनी बँकेकडे यासाठी प्रस्ताव दिला होता. तरुण कृषी व्यवसायासह उद्योग करण्यासाठी प्रयत्नशील आहेत; मात्र बँकांची अडचण निर्माण झाली होती. अखेर पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींना जिल्हा बँकेने कर्जपुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला. त्याबाबतचा करार दोन दिवसांत होणार आहे. मात्र जिल्हा बँकेस या कर्जासाठीची हमी राज्य शासनाकडून मिळणार नसल्याने बँक लाभार्थींना कर्ज पुरवठा करताना जिल्हा बँक तारण घेणार आहे. महामंडळाकडून तीन प्रकारची कर्जे देण्यात येत असून त्यासाठी पाच वर्षाची मुदत आहे. प्रकरणासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, लाईटबिल याशिवाय नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबतची माहिती अशा किरकोळ कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करता येते.

No comments:

Post a Comment