Friday, November 16, 2018

प्राध्यापकाने जाळली स्वतःच्याच पदवीची प्रमाणपत्रे


जत,(प्रतिनिधी)-
शिक्षकाच्या आयुष्यालाही अर्थ असतो, त्यांना कुटुंब आहे. मात्र, संस्था पगारच करीत नसल्याने त्यांना रस्त्यावर यावे लागत आहे. पगाराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे, तो कधी सुटेल ते पांडुरंगालाच माहित अशा आशयाची चिट्ठी लिहून सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजमधील एका प्राध्यापकाने त्यांची दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सर्व कागदपत्रे जाळून टाकली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे.
सुरज माळी असे त्या प्राध्यापकांचे नाव आहे. वारजे माळवाडी येथील सिंहगड महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण बीई, एमई झाले आहे. इतके उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून नोकरी करताना अत्यंत विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत घेतलेल्या या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही अशा अस्वस्थतेतून त्यांनी त्यांची सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून टाकली आहेत. हातामध्ये सर्व शैक्षणिक पदव्यांचा गठ्ठा घेऊन घरातील गॅसवर ते एक-एक प्रमाणपत्र जाळून टाकत असल्याचा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल झाला. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, गेल्या दीड वर्षांपासून कॉलेजकडून नियमित पगार देण्यात आलेला नाही. पगाराची 4 ते 5 लाखांची रक्कम थकीत आहे. त्यातच आता कामावरून कमी करण्यात येत असल्याची एक महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे.
 इतके शिक्षण घेऊनही ही अवस्था वाटयाला आली आहे. सिंहगडच्या प्राध्यापकांना आता कुणी कर्जही देईना झाले आहे. त्यामुळे मिळालेल्या पदव्यांचा काही अर्थच वाटत नाही. सिंहगड कॉलेजमधील प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. प्राध्यापकांकडून उच्च न्यायालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, एआयसीटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याकडे तक्रारी करून न्याय मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी आंदोलन करणार्या प्राध्यापकांना नोटीसा देऊन कामावरून कमी करण्यात येत आहे. सुरज माळी यांनाही अशाच प्रकारे कामावरून कमी करण्यात आल्याची एक महिन्यांची नोटीस देण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment