Tuesday, November 20, 2018

जतचे टँकर आटपाडीला पाठवले

जतची जनता मात्र तहानलेली
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हाधिकारी सांगली यांनी जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेले चार शासकीय टॅकर आटपाडी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात यावेत असा लेखी आदेश काढला आहे. त्यामुळे येथील चारपैकी दोन  टँकर आटपाडी येथे  पाठविण्यात आले आहेत. तर इतर  दोन टॅकरला चालक नसल्यामुळे  ते  जतमध्येच थांबून राहिले आहेत. जत येथे टँकरची आवश्यकता असताना ते सुरू केले जात नाहीत. परंतु येथील टँकर इतर तालुक्यात पाठवून प्रशासन आमच्या जखमेवर मिठ चोळत आहे ? असा प्रश्न नागरीकातून उपस्थित केला जात आहे.
          जत तालुक्यात चारा व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील एकोणीस  गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी केली आहे . परंतु प्रशासनाने अद्याप एकाही गावात टँकर सुरू केला नाही. पंचायत समिती, तहसीलदार  व प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी फक्त कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहेत. असा आरोप नागरीकातून होत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे .प्रशासन तातपुरती उपाययोजना करून वेळ मारून नेत आहे.  कोंतेवबोबलाद ( ता.जत ) येथील  टँकर मागणीचा प्रस्ताव जत तहसीलदार कार्यालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे एक महिन्यापूर्वी पाठविण्यात आला आहे. परंतु तो प्रस्ताव अद्याप मंजुर होवून परत आला नाही . त्यामुळे अद्याप तेथे  टॅकर सुरू करण्यात आलेला नाही. जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून आठ गावात टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव  महसूल विभागाकडे पाठविण्यात आले आहेत . या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही.
          जत तालुक्यात पाणी टंचाई जाणवणार असे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने टंचाई आढावा  बैठका घेवून  नियोजन केले होते. त्यामुळे जनतेच्या अशा पल्लवित झाल्या परंतु प्रत्यक्षात कांहीच होताना दिसत नाही. अशी खंत जि.प.व पं .स.सदस्य व्यक्त करत आहेत. जत येथील टँकर आटपाडी येथे पाठवून जिल्हाधिकारी यांनी जत प्रशासनाच्या नियोजनाला  खो दिला आहे काय ? अशी शंखा येथील नागरीकातून व्यक्त केली जात आहे . जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत चार शासकीय टॅकर आहेत. ते चारही टॅकर  आटपाडी येथे पाठविण्यात यावेत असा  लेखी आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केला होत. परंतु दोन टँकरला चालक नसल्यामुळे ते नेता आले नाहीत . सांगली जिल्ह्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आटपाडी येथे नऊ तर खानापूर व  विटा येथे चार टँकर सुरु करण्यात आले आहेत. खानापूर व विटा येथे टँकरची सोय झाली आहे . परंतु जत तालुक्यातील नागरीकांची गैरसोय होत आहे .अशी तक्रार आता नागरिक करत आहेत.
 जत तालुक्यातील  एकोणीस गावात पहिल्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवणार आहे. कोंतेवबोबलाद येथे  टॅकर सुरू होणार आहे. असे असताना येथील  शासकीय टँकर आटपाडीला पाठविणे पूर्णता चुकीचे आहे. अशी प्रतिक्रिया जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यानी दिली आहे.

No comments:

Post a Comment