जत,(प्रतिनिधी)-
सतत अवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने
उदरनिर्वाहच्या साधन म्हणून जत तालुक्यातील यावर्षी पन्नास हजार ऊसतोड
मजुरांनी स्थलांतर केलेले आहे. 20 एकर शेती असलेला शेतकरी
ऊसतोड मजूर म्हणून कामाला जातो.ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील बागायती क्षेत्र
कमी आहे. दिवसेंदिवस दुष्काळजन्य
परिस्थिती निर्माण होत असल्याने आष्टा, भिलवडी, सांगली, वाळवा या ठिकाणी अनेक कुटुंबांनी स्थलांतर
केलेले आहे. याकरिता पर्यायी व्यवस्था म्हणजे तालुक्यातील शेत शिवारात म्हैसाळचे
पाणी फिरल्यावर स्थलांतर कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
जत तालुक्यात मजुरांच्या हाताला कामाकरिता
एकही मोठा उद्योग - धंदा नाही. तरुण बेरोजगारांची संख्या देखील जास्त आहे. जत साखर
कारखाना राजकीय स्पर्धेत बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकासह मजूर, सभासद यांचे नुकसान मोठे झालेले आहे. आपलं
बिर्हाड पाठीवर घेऊन वर्षातील सहा महिन्यांपेक्षा जास्त भटकंती करणारा समाज
म्हणजे ऊसतोड कामगार.
उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता उसाच्या फडात अहोरात्र कष्ट करणार्या उसतोड
मजुराच्या हाताच्या कामातून साखर गोड होते खरी, मात्र या
ऊसतोड कामगारांचा संघर्ष कायम चालू असतो. ऊसतोड मजुरांसमोर अनेक प्रश्न आहेत.
सरकार मात्र ऊसतोड मजुरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी अपघातात,
विषारी साप चावून, पाण्यासाठी गेले असता
विहिरीत पडून मृत्यू होण्याची संख्याही वाढतच आहे.
ऊसतोड कामगार महामंडळाची घोषणा हवेतच विरली आहे. या महामंडळात आरोग्य विमा,
आरोग्य सेवा, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना
शाळेची व्यवस्था इ. बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.
ऊसतोड कामगार दुर्लक्षित : ऊसतोड मजूर
शासनाच्या अनेक सोई सुविधेपासून वंचित राहिला आहे.अनेक संकटाचा
सामाना करीत जीवनक्रमण करतात. ऊसतोड कामगारांची कोणतेही संघटना नाही. याउलट उसाला
दरवर्षी दर वाढवून दिला जातो. परंतु ऊसतोड मजुरांना मजुरी वाढविली जात नाही.
No comments:
Post a Comment