Sunday, November 18, 2018

सुमार कामगिरीमुळे जतचा शिक्षक निलंबित

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक प्रदीप काटे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी निलंबित केले. जाडरबोबलाद गावाखालील बिरादारवस्तीवरील कन्नड माध्यमाच्या शाळेत कार्यरत आहेत.
शिक्षक श्री. काटे हे शाळेवर वेळेवर राहत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. त्यानंतर शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी कवठेमहांकाळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आर. जी. पाटील यांना चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला होता. या चौकशीत श्री. काटे दोषी आढळून आले आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासातील सुमार प्रगती , बेशिस्त वर्तन, वारंवार गैरहजर आदी गोष्टींचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या अहवालावरून काटे यांना निलंबित करण्यात आले आहे.
तसेच काटे यांनी आपल्याला शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील ,सरपंच,शिक्षण विस्तार अधिकारी तसेच केंद्रप्रमुख आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार यापूर्वीच थेट पोलिसांत दिली आहे. यासाठी खात्याची परवानगी घेण्याची आवश्यकता असतानाही तशी परवानगी घेतली नाही, याचाही ठपका ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment