जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील सोलनकर चौक ते मार्केट यार्ड दरम्यानच्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे. हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
सध्या गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. नागज ते जतपर्यंतचे काम होत आले आहे. रुंदीकरण आणि त्याच्या मात्र ठेकेदाराने जत शहर वगळून पुढच्या कामाला सुरूवात केली आहे. वास्तविक शहरातील रस्ता अगोदर करण्याची आवश्यकता असताना जतवासियांना मरणाचुआ दारात ठेवून ठेकेदाराने नगारटेकापासून कामाला सुरूवात केली आहे. मधला दोन- अडीच किलोमीटर रस्त्याचे काम थांबवण्यात आले आहे. या मार्गावर मुख्य बसस्थानक आहे. बँका आहेत, मोठी दुकाने आहेत. त्यामुळे या मार्गावर गर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. रस्ता रूंद नसल्याने माल वहतुकीची वाहने, हात गाडीवाले,प्रवाशी वाहतूक करणारे यांनी हा रस्ता पार अडवून टाकला आहे. त्यामुळे सोलनकर चौक ते बसवेश्वर चौक हा रस्ता पार करायला तब्बल अर्धा तास लागतो.
याच रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यातच धुळीने वाहनचालकांना बेजार करून टाकले आहे. नाकात-तोंडातला धूळ वाचवायला जाताना लोकांना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे वाहनचालक वैतागून गेले आहेत. सध्याच्या कामाचा ठेकेदार,नगरपरिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस मूग गिळून गप्प आहेत. कुणाल कशाचेच काही पडले नाही.पण या धुळीने आणि खड्ड्यांमुळे लोकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्दी,खोकला,थंड-ताप आदी आजार शहरातून हद्दपार व्हायलाच तयार नाहीत. ठेकेदाराने तातडीने शहरातल्या रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment