Friday, November 30, 2018

पालकांनी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्यावेत:अपर्णा नाईक


जत,(प्रतिनिधी)-
 आज चांगल्या शिक्षण आणि संस्काराची गरज आहे. या पिढीवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन समुपदेशनतज्ज्ञ अपर्णा नाईक (पुणे) यांनी जत येथील अल्फोंसा स्कूल येथे समुपदेशन कार्यक्रमात बोलताना केले. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी व पालकांच्यासाठी अपर्णा नाईक यांचे समुपदेशन घेण्यात आले.

यावेळी फादर जॉर्ज, मुख्याध्यापक बिजू अॅथनी, पालक लहू कांबळे, मनोहर पवार, अनसर शेख, ङॉ चव्हाण, अनिल हलकुङे, शैला पवार, अनिल सावंत व शाळेतील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना सौ. नाईक म्हणाल्या की, पालकांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण व चांगले संस्कार देण्याची गरज आहे. पहिलीपासून ते दहावीपर्यंत हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. तो टप्पा पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आई- वडिलांचे मुलाकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब गंभीर असून लहानपणापासूनच त्यांना चांगले संस्कार देऊन ज्यादा गुण मिळविण्यापेक्षा तो एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
एकत्र कुटुंब पद्धती असताना मुलं कशी मोठी झाली, हे आईलाही कळत नव्हते. मात्र आता काळ बदललेला आहे अनेक घरात एक किंवा दोन मुले आहेत. त्यामुळे या मुलांच्यावरती विशेष लक्ष केंद्रित करून प्रत्येक मुलगा हा एक चांगला नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक यांनी केले. आभार मनोहर पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment