Thursday, November 29, 2018

एक लाखाची फसवणूक केल्याबद्दल एकावर गुन्हा


जत,(प्रतिनिधी)-
शहरातील राज हाॅटेलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांने जेवण्यासाठी आलेल्या एकाची आॅनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याच्या माध्यमातून एक लाखाची फसवणूक केली आहे. सचिन बसवंत बामणे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत बामणे यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

   पोलिसांनी मल्लिकार्जुन महादेव बासलगाव (रा. विजापूर) याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. 
    अधिक माहिती अशी, सचिन बामणे हे राज हाॅटेलवर कायम जेवणासाठी येत होते. या माध्यमातून आरोपी मल्लिकार्जुन बासलगाव याची तोंड ओळख झाली होती. दरम्यान, दि. 29 आॅक्टोंबर रोजी सचिन त्याच हाॅटेलवर जेवण्यासाठी गेले होते. यावेळी मल्लिकार्जुन याने आई आजारी असल्याचे सांगून सचिन यांना अठराशे रूपयांची मागणी केली होती. सचिन यांच्याकडे तेवढे पैसे नसल्याने त्यांनी मल्लिकार्जुन याला आपला मोबाईल देऊन आॅनलाईन पैसे ट्रान्स्फर करून पैसे घेण्यास सांगितले. 
  मात्र, मल्लिकार्जुन याने आपल्या खात्यात अठराशे रूपये ट्रान्स्फर करण्याऐवजी एक लाख रुपये ट्रान्स्फर केले. सायंकाळी सचिन घरी गेल्यावर एक लाख रुपये आपल्या खात्यातून ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज आला. यानंतर सचिन यांनी मल्लिकार्जुनला पैसे परत देण्यास सांगितले. मात्र, तो पैसे देत नसल्याने त्याच्या विरोधात जत पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा झाला आहे. याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक भवड करत आहेत.

No comments:

Post a Comment