Tuesday, November 27, 2018

तरुण कारागिराला मारहाण; तहसील कार्यालयावर मोर्चा

जत,(प्रतिनिधी)-
 बिळूर ( ता. जत ) येथील सलून कारागिरांना मारहाण  करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी व त्यांच्या विरोधात  कायदेशीर कारवाई करावी आणि  सलून कारगिराना संरक्षण मिळण्यासंदर्भात कायदा करावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यासाठी व्यवसाय बंद ठेवून तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने जत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

        याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , जातीवाचक शिवीगाळ व  अँक्ट्रासिट  कायद्यांतर्गत संरक्षण मिळावे . सलून सेवेचे दर ठरविण्याचा अधिकार नसतानाही ग्रामपंचायत ग्रामसेवक याविषयी ग्रामसभेत चर्चा घेतात व सेवेचे दर कमी करण्यासंदर्भात व्यवसाईकावर  दबाव टाकला जातो. दर कमी केले नाही तर ग्रामपंचायत हद्दीतील सलुन दुकान बंद करण्याची भीती घातली जाते . यासंदर्भात योग्य निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे .सुरुवातीस संत सेना महाराज मंदिर येथून मोर्चाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर जत  शहराच्या विविध भागातून मोर्चा तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले . यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन सपकाळ , जिल्हा संपर्क प्रमुख राम बनकर , तालुका अध्यक्ष बसवेश्वर गंगाधरे यांनी मनोगत व्यक्त केले .या मोर्चात मल्लिकार्जुन हडपद, गजानन सपकाळ , प्रा. सोमनाथ साळुंखे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment