Thursday, November 29, 2018

‘लाचलुचपत’च्या छाप्याने जत पोलीस ठाणे बदनाम


जत पोलिस ठाणे स्वच्छ करण्याची आवश्यकता; आतापर्यंत चार पोलिस अधिकारी जाळ्यात
जत,(प्रतिनिधी)-
जत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे याच्यावर सांगली येथील लाचलुचपत कार्यालयातील अधिकार्यांनी छापा टाकून त्याला परवा पोलीस ठाण्यातच जेरबंद केले. या घटनेने पुन्हा एकदा पोलीस ठाणे बदनाम झाले आहे. यापूर्वी तीन पोलिस अधिकार्यांना लाचलुचपतने आपल्या जाळ्यात ओढले होते. खाबुगिरीने जत पोलिस ठाणे संपूर्ण सांगली जिल्ह्यात कुप्रसिद्ध पावले आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी जत पोलिस ठाणे स्वच्छ करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

जतमध्ये सर्वसामान्य जनतेला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर न्याय मिळण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करावी लागतात. तरी अनेकांना न्याय मिळत नाही. सांगली जिल्ह्यातील सर्वांत मोठे पोलीस ठाणे जतमध्ये आहे. जत शहराचा विस्तार पाहता या पोलीस ठाण्यातील पोलिसांची संख्याही कमी आहे. मात्र या पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा वर्षांपूर्वी केवळ एकच फौजदार पोलीस ठाणे सांभाळत होता. मात्र आता पोलीस निरीक्षक सहाय्यक, पोलीस निरीक्षक, काही फौजदार असे चार ते पाच अधिकार्यांचा फाटा दिला असतानाही या पोलीस ठाण्याचा कारभार मात्र सुरूच होत नाही. गेल्या चार वर्षांत या पोलीस ठाण्यातील चार अधिकारीलाचलुचपतच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामध्ये घाडगे, शेख, गजानन कांबळे या अधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे.
जत पोलीस ठाण्याकडे अनेक हवालदार, फौजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक असतानाही काही नागरिक फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद घेतली जात नाही. पोलीस आउटपोस्ट मुचंडी, बिळूर, शेगाव, डफळापूर याठिकाणी आहेत. मात्र ज्या हवालदारांची नेमणूक याठिकाणी केली आहे, त्या ठिकाणी संबंधित हवालदार मुक्कामास राहत नाही. येथील नागरिकांना एखादी किरकोळ घटना घडली तरी जत पोलीस ठाण्याला यावे लागते. यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष देऊन ज्या ठिकाणी हवालदारांची नेमणूक केली आहे, त्या ठिकाणच्या पोलीस आउटपोस्ट सुरू आहेत का नाही, याची खात्री करावी, अशी मागणी होत आहे. शेगाव (ता. जत) येथील जबरी दरोड्यातील आरोपींचा तपास अजूनपर्यंत जत पोलिसांना लागला नाही. जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 50 ते 60 गावांचा समावेश आहे. जत शहराची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढतच असून जत शहरात भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी कार्यक्षम पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली. जत ते सांगली हे अंतर शंभर किलोमीटर असून दहा वर्षांपूर्वी या तालुक्यातील कोणीही लाचलुचपत अधिकारी कार्यालयाकडे तक्रार देण्यात जात नव्हते. मात्र गेल्या पाच वर्षांत जत तालुक्यातील सर्वसामान्य जनता एखादा अधिकारी अथवा कर्मचारी जर पैशासाठी नाहक त्रास देत असेल तर आता तो थेट सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार करतो. तालुक्यातील शासकीय वा कर्मचार्यांनी नाहक त्रास दिला तर जनता आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाण्यास धजावणार नाही, हे सोमवारच्या घटनेवरून दिसून येते.

No comments:

Post a Comment