जत,(प्रतिनिधी)-
उटगी (ता. जत) येथील लायाप्पा रायगोंडा विंचूर (वय 45) या शेतकर्याने कर्जास कंटाळून
शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात
हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उटगी येथे लायाप्पा रायगोंडा विंचूर आपल्या कुटुंबीयांसमवेत उटगी येथील नवीन
वसाहतीत राहत होते. त्यांची शेतजमीन उटगी ते सलगरला जाणार्या रोडवर भैरवनाथ शुगर फॅक्टरीजवळ आहे. यावर्षी पावसाने
दगा दिल्याने व नक्षत्रातील कोणत्याही पावसाने हात दिला नसल्याने त्यांनी पेरलेली ज्वारी
व तूर हे पीक जळून खाक झाले. शेतामध्ये आठशे फूट खोल बोअरवेल
घेऊनदेखील त्यास पाणी नाही. एकूण त्यांची 8 एकर शेती असून दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतातील सात एकर क्षेत्रातील
तुरीची रास केली होती. सात एकरामध्ये फक्त पन्नास किलोची दोन
पोती तुरीचे उत्पन्न निघाले होते. त्यामुळे ते हताश होते.
तसेच त्यांनी सोसायटी, पतसंस्था; तसेच इतर फायनान्स कंपन्या व खासगी सावकरांकडून काही रक्कम कर्ज घेतली होती.
दोन वर्षे पावसाने दगा दिल्याने शेतात काहीच पीक आले नाही. त्यामुळे ते कर्जाच्या खाईत लोटले होते. तुरीचे उत्पन्न
अत्यंत कमी झाले; तसेच ज्वारीचे पीकही जळून गेले. मग आता कर्जाची रक्कम कशी परतफेड करायची, या विवंचनेत
ते होते. या विवंचनामुळे ते रात्री उशीरा घरी पोहोचले होते.
लायाप्पा विंचूर यांच्या नावे 8 एकर शेती आहे. परंतु शेतीमध्ये काहीच पिकत नसल्याने ऊसतोड
मजूर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.त्यातून त्यांनी एका
मुकादमाकडून ऊसतोड उचल घेतली होती आणि ऊसतोड मजूर म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या पश्चिम भागात काम करून गुरुवारीच तुरीची रास करण्यासाठी गावाकडे परतला होते.
पण तुरीचे उत्पन्न न निघाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते.विदर्भ, मराठवाड्याचे शेतकरी आत्महत्येचे लोण आता सांगली
जिल्ह्यात सांगली जिल्ह्याचा पूर्वभाग वगळता पश्चिम भाग त्यामानाने
आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. परंतु पूर्वभागातील अनेक गावे दुष्काळाच्या
खाईत लोटून ओस पडली आहेत.
यापूर्वी
शेतकरी आत्महत्येचे सत्र विदर्भ मराठवाड्यात चालू होते. पण आता
शेतकरी आत्महत्येचे लोण सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आल्याची चर्चा घटनास्थळी चालू
होती. एका तरुण शेतकर्याने कर्जास कंटाळून
आत्महत्या केल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात होती. तसेच
नातेवाईक, पत्नी व मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
आत्महत्येचे वृत्त समजताच उटगीतील माजी सभापती बसवराज बिराजदार,
महांतेश पाटील, चंद्रकांत डोळळी, सिद्राया संख, आप्पू बिसनाळ आदींनी धाव घेऊन कुटुंबीयांना
धीर दिला. दरम्यान, उमदी ठाण्याचे पोलीस
उपनिरीक्षक प्रवीण सपांगे व जमादार, भोसले यांनी घटनास्थळी भेट
देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात
आला. सायंकाळी 6 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments:
Post a Comment