Friday, November 16, 2018

...अन्यथा रस्त्यावर उतरू


जत,(प्रतिनिधी)-
अपंग व्यक्तींना विविध सरकारी योजना, सोयी सुविधांचा लाभ जागतिक अपंग दिनपर्यंत देऊन अपंग दिन साजरा करा अन्यथा अपंगांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा अपंग संघटनेकडून  निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दरवर्षी 3 डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. अपंग हा देखील समाजाचा घटक आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच अपंगांसाठी असणारे कायदे, विविध शासननिर्णय, अधिकार याचा प्रचार व्हावा या हेतूने अपंग दिन साजरा केला जातो. पुणे जिल्ह्यात अपंग कायदा व शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. यामुळे हजारो अपंग जिल्ह्यामध्ये सोयी सुविधांपासून वंचित आहेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे़ त्यामुळे 3 डिसेंबर पर्यंत अपंगाना लाभ मिळण्यासाठी शासकीय स्तरावर कडक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
 जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांचा अपंगासाठी असणारा निधी खर्च करावा. ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळ्यांमध्ये व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करुन द्यावेत़, व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लेखी मागणी केलेल्या व्यक्तींना देण्यात यावे. अपंग शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी़ अपंगांना विवाहास प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे 50 हजार रुपये अनुदान मागणी केलेल्या जोडप्यांना त्वरीत देण्यात यावे. अपंग व्यक्तींना मुक्त संचार करण्यात यावा यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत येथे अडथळा विरहीत वातावरण निर्मिती करण्यात यावी़ जिल्हा परिषदेच्या 20 टकके निधीतील विविध योजनांमधून लाभ मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या अपंग लाभार्थ्यांना लाभ दिला जावा़ यासह अनेक योजनांचा लाभ जागतिक अपंग दिनापर्यंत देवून तालुका व जिल्हास्तरावर अपंग दिन साजरा करावा अशी मागणी केली आहे़.

No comments:

Post a Comment