Friday, November 30, 2018

शेगाव, मालगावमधील गुन्हे हंगामी दरोडेखोरांच्या टोळीकडून


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगावसह कुकटोळी येथील दरोड्यातील गुन्हेगारांच्या दिशेने पोलिसांचा तपास निघाला असून हे गुन्हे एकाच टोळीने केले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. गुन्हा करण्याची पध्दत एकच आहे. याच पध्दतीने मिरज तालुक्यातील मालगाव परिसरातही दरोड्याचा गुन्हा घडला असून ही हंगामी दरोडेखोरांची टोळी असावी, लवकरच गुन्हेगार पोलिसांच्या हाताला लागतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

बंद घरे, फ्लॅटला लक्ष्य करण्याच्या, ’धूमस्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून पळविण्याच्या घटना घडत असतानाच जीवावर बेतणारा हल्ला करून दरोडा घालण्याच्या घटना एकापाठोपाठ समोर येत आहेत. थेट दरवाजावर दगड घालून दरवाजा फोडणे, कुर्हाडीने कपाटे तोडणे आणि कुटुंबांना मारहाण करुन रोकड, दागिने लुटले जात असल्याने सध्या भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना शर्मा म्हणाले, दरोड्याच्या घटना गंभीरच आहेत. गुन्ह्याच्या पध्दतीवरुन हे कारनामे एकाच टोळीचे असावेत आणि ती टोळी हंगामी असावी, असे दिसते. आमचा तपास योग्य दिशेला असून लवकरच गुन्हेगार सापडतील. शर्मा म्हणाले, गावपातळीवरील ग्रामसुरक्षा दल सतर्क केली जातील. आगामी लोकसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची यादी अपडेट केली जात आहे. एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. काही गुन्हेगारांना तडीपारही करावे लागणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबरोबर साम ाजिक शांततेच्या दृष्टीने आवश्यक असणार्या सर्व उपाययोजना केल्या जातील.

No comments:

Post a Comment