Friday, November 16, 2018

संख येथील अंगणवाडीला खेळणी वाटप


बालदिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीचा पुढाकार
जत,(प्रतिनिधी)-
 खासगी इंग्लिश शाळेकडील मुलांचा ओढा रोखण्यासाठी आता अंगणवाड्या हायटेक केल्या जात आहेत. चिमुकल्या मुलांची बौद्धिक पात्रता वाढविण्यासाठी संख ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन चौदावा वित्त आयोगातून बालदिनाचे औचित्य साधून संखमधील विविध अंगणवाडी केंद्रांना खेळणी साहित्य वाटप केले.
अंगणवाड्यांमधील पुरेशा सुविधांअभावी मुलांना अंगणवाडीमध्ये पाठविण्यासाठी पालक तयार होत नाही. त्यामुळे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे आकर्षक शाळा, खेळणी आणि सोयी सुविधा असणार्या शाळांवर पालकांचा भर आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये मुलांची संख्या घटत चालली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर संख ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून अंगणवाडीत शिक्षण घेत असताना मुलांना शिक्षणाची चालना देण्यासाठी खेळणी देण्यात आली आहे. यामुळे अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तसेच लहान मुलांना चांगल्या दर्जाचे पूर्वप्राथमिक शिक्षण क्रीडा, कला अशा शिक्षणाची आवड निर्माण होणार होणार आहे. अंगणवाडी क्रमांक 115, 117, 118, 119 यांना खेळणी साहित्य वाटप करण्यात आले.
यात घसरगुंडी, झोपाळे, लगोरी सेट, फुटबॉल, जादूची किमया, पझल ब्लॉक, इम्रॉडरी लर्निंग किट, बेड टॉय, रिंग गेम अल्फाबेट सेट, टू इन वन ब्रेन, पाहा खेळा आणि शिका, अक्षर जुळवणी संच, होम इन माईंड आदी खेळण्याचे साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी के. डी. नरळे म्हणाले की, ग्रामीण भागातील व वाड्या वस्त्यांवरील अंगणवाडी केंद्र हे पुढील काळात चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, आपल्या गावातील प्रत्येक मुलाला अंगणवाडीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आवड निर्माण करण्यासाठी सरकार व ग्रामपंचायतिच्या माध्यमातुन आवश्यक भौतिक सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यावेळी संख सरपंच मंगल पाटील, ग्रामविकास अधिकारी के. डी. नरळे ग्रामपंचायत सदस्य अमरीश कांबळे, मल्लिकार्जुन जिगजेणी, एकात्मिक बालविकास योजनेच्या पर्यवेक्षिका वाय. एस. मकानदार, आंगणवाडीच्या सेविका उपस्थित होते.

No comments:

Post a Comment