Saturday, November 24, 2018

जत तालुक्यातील जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करावा:तम्मनगौडा रवीपाटील


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून पावसाचा पत्ता नाही. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीतून शेतकर्याला उत्पन्न नाही. जनावरांना चारा नाही, शेतकर्याला पशुधन सांभाळणे अवघड झाले असून चार्याची कमतरता भासू लागली आहे. त्याचा मोठा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून जनावरांना पिण्याच्या पाणी व चारा नसल्याने अनेकांना गावे सोडण्याची पाळी आली आहे. प्रशासनाने तातडीने जत तालुक्यात टँकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौङा रविपाटील यांनी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्याकडे केली आहे.
ते म्हणाले की, जत तालुक्याच्या तलाव व विहीरीत काहीच पाणी उरले नाही. कोरडे ठणठणीत विहिरी आहेत व बोर मध्ये पाण्याचा तळ गाठला असून पाणी नसल्याने शेतातून ओला चारा घेता येत नाही. जनावरांना चारा आणायचा कोठून या चिंतेत येथील पशुपालक आहेत. म्हैसाळचे पाणी जत तालुक्याच्या पश्चिम भागातील काही गावात आले आहे. मात्र तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गाव सोडण्याची पाळी आली आहे. शेतकर्यांना शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात पशुधन संभाळून त्यापासून दूधाचा व्यवसाय करत आहेत. परंतु यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असताना जनावरांच्या चार्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
जनावरांसाठी चारा शोधताना शेतकर्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. जनावरांना चारा नसल्याने या भागातील दुग्धव्यवसायावर याचा मोठा परिणाम होत असून शेतकर्यांच्या आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे. पशुधनासाठी चारा आणायला येथील पशुपालकांना सावकारी कर्ज काढावे लागत असून अनेक शेतकरी आपली जनावरे कर्नाटकात विकत आहेत. त्यासाठी शासनाने तातडीने या तालुक्यातील गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून तसेच पंचायत समिती गणनिहाय चारा छावण्या सुरू करून या तालुक्यातील पशुधन व शेतकरी यावेत अशी मागणी सभापती रवी पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment