जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो
भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातल्या गुड्डापूर येथील श्री धानम्मा देवीची
कार्तिकी यात्रा 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात भरणार असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त चंद्रशेखर गोब्बी, विठ्ठल पुजारी यांनी पत्रकार
बैठकीत दिली.
दरवर्षीप्रमाणे कार्तिक अमावस्येला श्री
धानम्मा देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात भरते. कर्नाटक व सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भक्त
दिंडीप्रमाणे पायी चालत
येणार्यांची संख्या मोठी लक्षणीय आहे. यात्रेचा मुख्य दिवस 6 डिसेंबर रोजी असून यादिवशीचा कार्तिक
दीपोत्सव व पालखी उत्सव सोहळा महत्त्वाचा असतो. या उत्सवादिवशी
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप आदी उपस्थित
राहणार आहेत.
7 डिसेंबर रोजी श्री धानम्मा देवीचा
रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास कर्नाटक राज्याचे
आरोग्यमंत्री शिवानंद पाटील, महसूलमंत्री राजशेखर पाटील,
आमदार आनंद न्यामगोंडा उपस्थित राहणार आहेत. यंदा
पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईची परिस्थिती असली तरी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार
आहे. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था व अन्य सोयीसुविधा यांची
चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या यात्रेसाठी येणार्या दुकानदारांना,हॉटेल मालकांना जागा वाटप करण्याचे काम
सुरू आहे.यासाठी यात्रा समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात
आले आहे. अन्नदासोह (प्रसाद)ची सोय सोरडी मार्गावरील कर्नाटक भवन येथे करण्यात आली आहे. यावेळी देवस्थान विश्वस्त अशोक पुजारी, गुरुपाद पुजारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment