जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात बनावट दारू, भेसळयुक्त शिंदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून दारूचा खरेपणा सिद्ध करण्याची कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसल्याने याचा गैरफायदा घेतला जात आहे. उत्पादन शुल्कची यंत्रणादेखील सक्षम नाही. अपुर्या कर्मचार्यांच्या बळावर कधी तरी अवैध दारू अड्ड्यांवर जुजबी कारवाईचा फार्स केला जात आहे.
आठ दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील माळवाडी येथे उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारू निर्मिती अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत त्यांना स्पिरीटची अवैधरित्या आयात करून बनावट दारू तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात अशा बनावट दारू विक्रीचा सुळसुळाट असल्याचे सांगितले जात आहे. या तीनही तालुक्याला लागून कर्नाटक सीमाभाग असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणात हुबळीमेड आणि बनावट देशी-विदेशी दारू आयात होत आहे. शिवाय जत तालुक्यात अवैधरित्या दारूची विक्री करणार्या अड्ड्यांची संख्या मोठी आहे. तळीरामांना दारू कोठून आली आहे, याच्याशी काही देणे-घेणे नसते.दारू सहजरित्या उपलब्ध होते, हाच त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे याचा गैरफायदा घेऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू विकली जात आहे.
जत तालुक्यात 60 च्या आसपास दारू विक्री आणि बिअरबार आहेत. दारूला उठाव नसल्याचे कारण देत अनेकांनी आपली दुकाने बंद केली आहेत. मात्र प्रत्यक्षात गावागावांमध्ये दारू सहजरित्या उपलब्ध होत असल्याने ही दारू कोठून येते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जत तालुक्याच्या निम्म्या भागाला कर्नाटकचा विळखा आहे. याच्या आड अनेक गुन्हे घडत आहेत.खून,चोर्या, मारामार्या त्याचबरोबर बनावट दारू, भेसळयुक्त शिंदी,चंदन, गांज्या,कापूस, वाळू यांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. याकडे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करीत असतात. याला राजकीय आश्रयही लाभत असल्याने प्रत्येकजण यात आपले उखळ पांढरे करून घेत असतो.
जत तालुक्यात उत्पादन शुल्कची यंत्रणा अपुरी आहे. शिवाय अवैध काम करणार्या लोकांशीही त्यांचे लागेबांधे आहेत. याच कारणामुळे अनेकदा कारवाईची टीप अवैध अड्डे असणार्या लोकांना मिळते आणि पथकाला रिकाम्या हाताने माघारी परतावे लागते. जतमध्ये मुजोर झालेल्या लोकांनी पथकावरही हल्ला करून उत्पादन शुल्कच्या कर्मचार्यांना जखमी केले होते. निवडणूक काळात तर बनावट दारू विक्रीला तर उधाण येत असतेच.पण वर्षातले बारा महिने या ठिकाणी बनावट दारूची बिनबोभाट विक्री होत असते. त्यामुळे शेवटी दारूचे सेवन करणार्यांना आपल्या शरीराची काळजी करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment