Tuesday, November 6, 2018

वैविध्य असलेल्या ऑनलाइन शुभेच्छांचा वर्षाव


जत,(प्रतिनिधी)-
व्हॉट्स अॅपवरील नवे दिवाळी स्टिकर्स असो किंवा फेसबूकवरील जीआयएफ... इन्स्टाग्रामवरील माय स्टोरी असो अथवा हाइकवरील अनोखे स्टिकर्स... अशा विविध माध्यमातून नेटिझन्स आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दिवाळीचा प्रकाशोत्सव सुरू झाल्याने शुभेच्छांचा वर्षावदेखील सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे. कुणी व्हिडिओतून तर कोणी फेसबूक लाइव्हवरून ...कुणी मायस्टोरीद्वारे तर कुणी छायाचित्रांतून दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊ लागला आहे.
घरापासून दूर असलेल्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सध्या सोशल मिडिया साइट्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यात व्हॉट्स अॅप,फेसबूक आणि हाइकवरील नव्या स्टिकर्स फंक्शनची धूम पाहायला मिळत असून प्रत्येकाकडून शुभेच्छा देण्यासाठी या अनोख्या स्टिकर्संचा वापर होत आहे. कुठे तरी हा नवा फंडा प्रत्येकाच्या पंसदीस उतरत आहे. विशेष म्हणजे या स्टिकर्सचा उपयोग तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या आनंदाने करत आहेत. वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशीचे खास स्टिकर्स उपलब्ध असल्याने या स्टिकर्सचा सध्या ट्रेंड आहे. जीआयएफ, छोटे व्हिडिओ, छायाचित्रे या माध्यमातूनही नेटिझन्स एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याशिवाय आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारेही शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच फेसबूक लाइव्ह आणि इन्स्टा लाइव्हद्वारे दिवाळीचे प्रत्येक अपडेट्स दिले जात आहेत.



No comments:

Post a Comment