जत,(प्रतिनिधी)-
जत शहराला होत असलेला दूषित पाण्याचा पुरवठा लक्षात घेऊन शहरातील निम्म्यापेक्षा अधिक नागरिक विकतचे पाणी पित आहेत.त्यामुळे पाणी विकणार्या लोकांना धंदा चांगलाच फोफावला आहे. कोण कशीही पाण्यावर आकारणी करून नागरिकांना लुटत आहेत. त्यामुळे नगरपालिकेनेच माफक दरात शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा,यासाठी वॉटर एटीएम केंद्रे उभी करावीत, अशी मागणी होत आहे.
डिझेलचे, विजेचे दर वाढल्याचे कारण देत अनेक शुद्ध पाण्याची विक्री करणार्या लोकांनी मन मानेल तशा दराने पाण्याची विक्री करत आहे.अलिकडच्या काही वर्षात शहरात सतत कोणत्या न कोणत्या साथीच्या आजाराचा फैलाव होत आहे. जत शहराला पुरवठा करण्यात येणारा पाणीपुरवठा हा जुजबी शुद्धीकरण प्रक्रियेतून केला जातो. पाण्याला दुर्गंधी,गढूळता यामुळे सर्रास नागरिक या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करता अन्य कामासाठी करतात. पिण्यासाठी खासगी शुद्धीकरण केंद्रांमधून पाणी आणले जाते किंवा मागवले जाते. मुळात शहराला आठवड्यातून फक्त दोनवेळा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहरातल्या खानावळी, हॉटेलांना रोज पाणी पुरवठा करणार्यांची चलती आहे. काही लोक ट्रॅक्टरद्वारे पाणी आणून पुरवतात. ही मंडळी मन तशी पाण्यासाठी आकारणी करतात. यामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
शहरातले लोक पाणीपट्टी भरतात. अलिकडच्या काळात यात मोठी वाढही झाली आहे. पण त्यानुसार शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. पण यात ते अपयशी ठरत आहेत. निदान शहरात जागोजागी वॉटर एटीएम उभारून माफकत दरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment