गणेशोत्सवानंतर निर्णय होण्याची शक्यता; इच्छुक नाराज
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषद पदाधिकारी कार्यकाल सव्वा वर्षे झाला असल्याने पदाधिकारी बदलाची मागणी होऊ घातली आहे. मात्र वरिष्ठ स्तरावरून हिरवा कंदील न मिळाल्याने इच्छुक मंडळी नाराज दिसत आहेत. जत, तासगाव, मिरज तालुक्यातील भाजप सदस्य तसेच वाळव्याच्या रयत विकास आघाडीने बदलाची जोरदार मागणी केली आहे. ‘पदाधिकारी बदलाबाबत विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानांवर गेलेला नाही. त्यांच्या संमतीशिवाय पदाधिकारी बदलले जाणे अशक्य आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्यांना सव्वा वर्षे झाली आहेत. सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर पाहू, असे नेत्यांनी काही इच्छुकांना सांगितले होते. महापालिका निवडणूक झाल्याने इच्छुकांनी पदाधिकारी बदलाची मागणी पुन्हा उचलून धरली आहे. काही सदस्य व नेत्यांनी महिन्याभरापूर्वी पालकमंत्री देशमुख यांची भेट घेतली होती. मात्र पदाधिकारी बदल गणेशोत्सवानंतर होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप आघाडीचे संख्याबळ 35 आहे. भाजपचे 23 व भाजप पुरस्कृत 2 (ब्रह्मदेव पडळकर व प्रमोद शेंडगे) सदस्य, शिवसेना 3, रयत विकास आघाडी- 4, अजितराव घोरपडे गट 2 व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1 सदस्य आहेत. सव्वा-सव्वा वर्षाने बदल केल्यास अनेक इच्छुकांना संधी मिळेल, असा मुद्दा उपस्थित करत 35 पैकी 16 ते 19 सदस्यांनी बदलाची मागणी केल्याचे समजते.
पदाधिकारी बदलासाठी जत तालुका आघाडीवर आहे. जत तालुक्यातील भाजपचे सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार, स्नेहलता जाधव, रेखा बागेळी, मंगल नामद या पाच सदस्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व खा. संजय पाटील यांना विनंती पत्र दिले आहे. जि.प.च्या विद्यमान पदाधिकार्यांची मुदत सव्वा वर्षापेक्षा जास्त झाली आहे. ठरल्याप्रमाणे पदाधिकार्यांचे राजीनामे घ्यावेत. जत तालुक्याला अध्यक्षपद द्यावे, असे पत्रात म्हटले आहे.
मिरज तालुक्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली आहे. सव्वा वर्ष झाल्याने पदाधिकारी बदलासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र देण्याची विनंती केली आहे. घोरपडे गटही पदाधिकारी बदलात संधीच्या अपेक्षेत आहे. मिरज तालुक्यातील भाजपच्या सहा सदस्यांनी पदाधिकारी बदलाची मागणी केल्याचे बोलले जात आहे
जत,मिरज पदाधिकारी बदलासाठी आघाडीवर असले तरी पलूस,कडेगाव, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते मात्र या बदलाला फारसे उत्सुक दिसत नाहीत. कारण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे पलूस व कडेगाव तालुक्याचे भाजप नेते आहेत. उपाध्यक्ष सुहास बाबर खानापूर येथील आहेत, शिवाय त्यांच्या पाठिशी शिवसेनेचे सर्व सदस्य आहेत. दरम्यान, नेतेमंडळी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेले आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या मागणीपासून पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडीतील भाजप आघाडीचे सदस्य दूर आहेत.
खा. संजय पाटील यांचे चुलते डी. के. पाटील हे अध्यक्षपदासाठी प्रबळ इच्छुक आहेत. तर अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विश्वासातील समजले जातात. त्यामुळे बदलाबाबतचा निर्णय औत्सुक्याचा ठरला आहे. महाडिक भेटले पालकमंत्री सुभाष देशमुख यांना रयत विकास आघाडीतील नेते राहुल महाडिक यांनी मागे पालकमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेतली होती. सव्वा वर्ष झाल्याने जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल व्हावा व रयत विकास आघाडीला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. पदाधिकारी बदलाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. बदल करायचा अथवा नाही याबाबत तेच निर्णय घेतील, असे ऐकायला मिळाले आहे. मात्र आता गणेशोत्सवाचा काळ असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय जरी गेला तरी त्यांच्याकडून लवकर हिरवा कंदील मिळण्याची शक्यता नाही.त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागणार आहे. उत्सव काळातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पाहता त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून सांगली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा विषय मुख्यमंत्री यांच्या कानावर जाणे अवघड आहे. हा बदलाचा निर्णय हा गणेशोत्सवनंतर होण्याची शक्यता अधिक आहे.
No comments:
Post a Comment