Saturday, September 22, 2018

देशाला बलशाली करण्याची जबाबदारी शिक्षकांची : सुभाष देशमुख


जत.(प्रतिनिधी)-
शिक्षकांनी पारंपारिक शिक्षणाला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शिक्षण द्यावे तसेच मुलांमध्ये व्यवहार ज्ञान कसे वाढीस लागेल,यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन सहकारमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जत येथे बोलताना केले.
 जत येथील विजापूर रोडवरील उमा नर्सिंग कॉलेजच्या सभागृहात लायन्स व लायनेस क्लबच्या वतीने लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कारांचे व आदर्श पतसंस्था पुरस्कारांचे वितरण समारंभ पार पडला. यावेळी मंत्री श्री. देशमुख बोलत होते. यावेळी श्री. देशमुख यांच्याहस्ते तालुक्यातील बारा शिक्षक व तीन पतसंस्थांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री देशमुख म्हणाले, देशाला पुढे नेऊन बलशाली करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा चांगला नागरिक झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सांगली जिल्ह्याचे आदर्श व्यक्तिमत्व असलेले वसंतदादा पाटील यांच्या नावाने अनेक सहकारी संस्था आहेत मात्र त्या डबघाईला आल्या आहेत. सहकाराचा स्वाहाकार झाला झाल्याने अनेकदा मनाला वेदना होतात,पण सहकार शुद्ध करण्याची जबाबदारी  मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दिली आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र  सहकार क्षेत्रात आघाडीवर नेण्याचाा प्रयत्न राहील.  
    सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले, शिक्षणाची समाजात अधोगती होत असून ही अधोगती थांबवून राष्ट्र बलशाली घडवायचे शिक्षकांनी चांगले काम करण्याची गरज आहे. आमदार विलासराव जगताप म्हणाले, लायन्स क्लबने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना चांगले काम करण्याचे बळ दिले आहे. डॉ रवींद्र आरळी म्हणाले, शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन लायन्स क्लबने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यावेळी घन:शाम चौगुले (एम.व्ही.हायस्कूल,उमदी),धानाप्पा बाजी(कन्नड प्राथमिक शाळा,जाडरबोबलाद),बालाजी पडलवार (मोटेवाडी),कुमार इटेकर (गुरुबसव हायस्कूल,संख), सुनील सूर्यवंशी (साळमळगेवाडी),सतीश वाघमारे (जिरग्याळ), मुबारक मुल्ला (बालविद्यामंदिर,जत),मलकारी होनमोरे ( कन्नड शाळा,बोऱ्याळवस्ती-संख),जयंत गेजगे(दरिबडची),श्रीमती शोभा खैराव(कन्नड शाळा,संख),प्रकाश माळी(कुलाळवाडी),श्रीमती रेणू गायकवाड (म्हैसाळ-मिरज)या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी स्वागत जत लायन्स क्लबचे अध्यक्ष दिनकर पतंगे यांनी तर प्रास्ताविक डॉ. रवींद्र आरळी यांनी केले. यावेळी जि.. शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौङा रवी पाटील, गोपाल बजाज, मिलिंद पोरे, सरदार पाटील, बसवराज बिरादार, शिवाजीराव ताड, आप्पासाहेब नामद, डॉ. प्रभाकर जाधव, आर.के. पाटील, सुनिल पवार, दिनकर पतंगे, डॉ. ममता तेली, अशोक पाटील, राजेंद्र आरळी, शांतीलाल ओसवाल, संदीप लोणी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment