Saturday, September 8, 2018

जत तालुक्यातल्या 18 गावांनी केली पाण्याच्या टँकरची मागणी


पन्नासहून अधिक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई; सहा गावांसाठी कुपनलिका अधिग्रहीत
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याची ट्ंचाई तीव्र झाली असून पन्नासहून अधिक गावांना याची मोठी झळ बसू लागली आहे. सध्या 18 गावांनी पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, सहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटवण्यासाठी प्रशासनाकडून परिसरातील कूपनलिका अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
पूर्व भागातील माडग्याळ या महत्त्वाच्या आणि लोकसंख्येने अधिक असलेल्या गावाला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रशासनाने यासाठी परिसरातील 8 कूपनलिका आणि विहिरी अधिग्रहीत करून गावाला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा प्रयत्न अपुरा पडत आहे. गेल्या पावसाळ्याच्या तीन महिन्यात तालुक्यात तुरळक पाऊस वगळता एकही दमदार पाऊस झाला नसल्याने मोठे संकट ओढवले आहे. खरिप कधीचा वाया गेला आहे.परंतु, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नदेखील आ वासून उभा राहिला आहे. लोकांना दोन-तीन किलोमीटर अंतरावरून सायकलवरून, डोक्यावरून, खांद्यावरून पाण्याच्या घागरी वाहून आणाव्या लागत आहेत.
जतच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात पाणी टंचाईची तीव्रता मोठी आहे. कोंतेबोबलाद, अंकलगी, सोनलगी, काराजनगी, व्हसपेट, सोन्याळ, हळ्ळी,कोणबगी, आसंगी (जत), पांढरेवाडी, लमाणतांडा (दरिबडची), तिल्याळ, दरिबडची,माडग्याळ, अंतराळ, अचकनहळ्ळी, एकुंडी, गुगवाड या गावांनी गावाला पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे आहे. दरम्यान, सध्या टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्याने सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यात 50 हून अधिक गावांना पिण्याच्या पाण्याची मोठी झळ बसत आहे. ऐन पावसाळ्यातील ही पाणीटंचाई लोकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून पाण्याची गरजदेखील मोठी असते. ही गरज भागवताना लोकांची दमछाक होत आहे.
सध्या प्रशासनाने बागलवाडी, माणिकनाळ, माडग्याळ, तिकोंडी, शिंगणापूर, कोणबगी या सहा गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्याच्यादृष्टीकोनातून परिसरातील कुपनलिका अधिग्रहीत आहेत. परंतु, तरीही पाणी टंचाई जाणवत असल्याने यातील काही गावांनी टँकरची मागणी केली आहे. गेल्या तीन महिन्यात जत तालुक्यात आतापर्यंत फक्त 144.6 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. या कालावधीत सरासरी 270 मिलिमीटर पाऊस पडत असतो. शिवाय पूर्वभागात तर अजिबातच पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्याच केल्या नाहीत. आणि ज्यांनी पेरण्या केल्या होत्या, त्या पूर्णपणे वाया गेल्या आहेत. सरकारने पंचनामे करून शासकीय मदत देण्याची गरज असून मात्र याबाबत कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment