Monday, September 17, 2018

हिंदी राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीला चालना देणारी भाषा:श्रद्धा गायकवाड

जत,(प्रतिनिधी)-
हिंदी ही सर्व भाषांना बरोबर घेऊन जाणारी भाषा असल्यामुळे ती खऱ्या अर्थाने  राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीला चालना देणारी भाषा आहे. हिंदी भाषा ही माणसाची मने जोडणारी असल्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदी राष्ट्रभाषा होण्याची हक्कदार  आहे,असे प्रतिपादन नवोदित सिने अभिनेत्री श्रद्धा गायकवाड यांनी केले.
  जत येथील  राजे रामराव महाविद्यालयात आयोजित केलेल्या  हिंदी दिनानिमित्त'नाटक,सिनेमा आणि हिंदी भाषा' या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री गायकवाड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस.ढेकळे हे होते.
       हिंदी भाषा ही जगातील सर्वात जास्त बोलली  जाणारी भाषा आहे. हिंदी नाटक व सिनेमाच्या कक्षा जगभर विस्तारल्या आहेत त्यामुळे हिंदी नाट्य व सिनेमा क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत,असे सांगून त्यांनी नाटक व सिनेमा च्या तांत्रिक व व्यावसायिक बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या व त्यांच्या आगामी शटल व फुलस्टोप या सिनेमाना प्रतिसाद देण्याचे आव्हान केले.
    प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे म्हणाले कि,  हिंदी ही भारतीय अस्मितेची भाषा असून भारतीय सभ्यता आणि संस्कृतीची जननी आहे. तिचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान आहे. आपण सर्वानी तिचा सन्मान केला पाहीजे.
      प्रारंभी  हिंदी विभागाच्या वतीने बनवण्यात  आलेल्या 'हिंदी भाषा व साहित्य' या संदर्भातील भित्तीपत्रिकेचे  उद्घाटन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रा.एच.डी.टोंगारे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सतीशकुमार पडोळकर यांनी तर आभार प्रा.योगिता देशमुख यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अशोक बोगुलवार, डॉ.सोमनाथ काळे, प्रा.सागर सन्नके यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment