Sunday, September 30, 2018

जत तालुका दुष्काळ जाहीर करा: सोमनिंग बोरामणी


जत,(प्रतिनिधी)-
सीमावर्ती जत पूर्व भागात खरिप पूर्ण वाया गेला आहे. आता रब्बीचीही शाश्वती राहिलेली नाही.त्यामुळे राज्य शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळोंडगी (ता.जत) येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष सोमनिंग बोरामणी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
जत तालुक्यातल्या पूर्व भागातला शेतकरी पावसाअभावी देशोधडीला लागला आहे. सलग तीन वर्षे खरिप आणि रब्बी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे सध्या या भागातला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मॉन्सून पावसाचे चारही महिने संपले तरी एकही पाऊस झालेला नाही. पिके वाळून गेली.त्यामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्यायला पाणी नाही. अशा बिकट अवस्थेत या भागातील माणसे जगत असताना लोकप्रतिनिधी मात्र आवाज उठवायला तयार नाहीत. शासनही काही पावले उचलायला तयार नाही. अशा परिस्थितीत लोकांनी जगायचे कसे आणि कुणाकडे पाहयचे, असा सवाल श्री. बोरामणी यांनी केला आहे.
जत पूर्व भागातील संख,भिवर्गी,तिकोंडी,बोर्गी, जाडरबोबलाद,उटगी,सोन्याळ,माडग्याळ या भागात पाऊसच झाला नाही. पिके वाळून गेली. अजूनही पाऊस नसल्याने रब्बी पिकाचीही शाश्वती राहिलेली नाही. शेतकर्यांनी बहुचर्चित विमा भरला पण काहींना तटपुंज्या रकमा मिळाल्या. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. डाळिंबासारखी या भागातल्या लोकांना वरदायी ठरणारी पिकेदेखील हातची गेली आहेत. सध्या चार्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे.त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे. चार पैसे मिळायचे तेही बंद झाले आहे. खिशात दाम नाही,हाताला काम नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment