Wednesday, September 26, 2018

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा सेवा नवीन बदलांसह सुरू


जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाच्या सातबारा संगणकीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा ही महसूल विभागाची योजना सांगली जिल्ह्यासह काही जिल्ह्यात काही बदलांसह नव्याने सुरू होत आहे. डाटाचा आकार कमी करण्यात आला आहे.
सर्व्हरवर अतिरिक्त ताण येत असल्याने आणि सत्यता पडताळणीत किरकोळ त्रुटी असल्याने मागील चार महिन्यांपासून ही सेवा बंद करण्यात आली होती. संगणकीय तांत्रिक बिघाडामुळे डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा सेवा काही काळ बंद करण्यात आली होती. तसेच ई फेरफार विभागाला मिळालेल्या तक्रारीनुसार हे सातबारे कोणतीही व्यक्ती सहजतेने मिळवून त्याचा गैरफायदा घेत असल्याने शासनस्तरावर नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे शासनाने विविध ठिकाणी साठविला जाणारा डाटा एकाच सर्व्हरवर म्हणजे क्लाऊडवर (सेंट्रलाइज डाटा स्टोरेज सिस्टिम) एकत्र करण्यास सुरवात केली. परंतु त्यामुळे सर्व्हर कोलमडण्याचे स्थिती निर्माण झाली. या पीडीएफ फाईलचे आकारमान आता कमी करण्यात केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला पडताळणी क्रमांक अनिवार्य कऱण्यात आला आहे. त्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षितता जपली जाईल आणि दुरुपयोग होणार नाही. जोपर्यंत हा पडताळणी क्रमांक शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जुळत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीशिवाय इतर व्यक्तीला सातबारा काढता येणार नाही, या बदलांसह ही सेवा नव्याने सुरू होत आहे.
कोल्हापूर, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गोंदिया येथील यंत्रणा भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सर्व्हरवर आहे. त्यातच हा जूना डेटा असून त्याची घनता मोठी असल्याने सर्व्हर लिंक डाटा ट्रान्सफर होताना अडचण निर्माण होत आहे. येथील डेटा क्लाऊडवर घेण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच या जिल्ह्यातील यंत्रणा सुरळीत होत आहे.

No comments:

Post a Comment