जत,( प्रतिनिधी)-
केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार 20 व्या पशुगणनेस 30 सप्टेंबरपासून राज्यात सुरुवात करण्यात येत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी येथे शुभारंभ होईल. संपूर्ण देशात एकाच वेळी ऑनलाईन पध्दतीने टॅबलेटद्वारे ही पशुगणना होत असून, राज्यात एकूण 7 हजार 126 टॅबलेटस्ची खरेदी करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावात, वॉर्डात प्रत्यक्ष भेटी देऊन घरोघरी असणार्या पशुंची गणना डिसेंबर महिनाअखेर करण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन आयुक्त हे राज्याचे पशुगणनेचे मुख्य प्राधिकारी आहेत. राज्यात या कामासाठी 7 हजार 300 प्रगणक व 1720 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. 20 व्या पशुगणनेत गाई-बैल, म्हशी व रेडे, मेंढरे, शेळ्या, डुकरे, घोडे, शिंगरे, खेचरे, गाढवे, उंट, कुत्रे, हत्ती, ससे यांची प्रजातीनिहाय वर्गवारी व वयानुसार माहिती गोळा केली जाणार आहे. याशिवाय कुक्कुट व कुक्कुटादि पक्षी आदींसह पशुधन क्षेत्रातील विविध उपकरणाचीही माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्या प्रगणकास शेतकर्यांनी पशुधनाची माहिती देण्याचे आवाहन डॉ. उमाप यांनी केले आहे.
अकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून पशुधन विमा योजना राबविण्यात येते. याकामी केंद्र व राज्य शासनाने विमा हप्त्यांकरिता दिलेल्या एकूण 3 कोटी 3 लाख 55 हजार रुपये निधीतून राज्यातील एकूण 50 हजार पशुधन घटकांचा विमा उतरविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे÷. फेब्रुवारी 2016 ते मार्च 2017 पर्यंत एकूण 2 लाख 97 हजार 860 जनावरांचा विमा उतरविण्यात आला. जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण 8 हजार 707 दाखल दाव्यांपैकी 8 हजार 327 मयत जनावरांचे दावे कंपनीमार्फत निकाली काढण्यात आले. त्यापोटी कंपनीने 23 कोटी 86 लाख 90 हजार रुपये जनावरांच्या मालकांना दिलेले आहेत.
जागतिक अंडी दिन 12 ऑक्टोंबरला साजरा करणार..
अंड्यांतील पोषणमूल्याचे मानवी आहारातील महत्व या विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेने घोषित केल्यानुसार जागतिक अंडी दिन दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यातील दुसर्या शुक्रवारी साजरा करण्यात येतो. त्यानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत 12 ऑक्टोंबर रोजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी उकडलेल्या अंड्यांचे वाटप व त्याचे महत्व सांगितले जाणार आहे.
No comments:
Post a Comment