जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या उमदीमध्ये एसटी स्टँड परिसरात मोठी वाहतूककोंडी होत आहे.रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे तर हा भाग मृत्यू सापळाच बनला आहे.जत येथील सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत आहे.
जतपासून 52 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाकडे प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्यांचे नेहमी दुर्लक्ष होत असून उमदी (ता. जत) येथील एस. टी. स्टँडवरील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे. उमदी (ता. जत) हे गाव महाराष्ट्र व कर्नाटकाशी जोडणारा एक मुख्य रस्ता आहे. या परिसरात 30 ते 40 गावाचा समावेश आहे. या गावावरून पंढरपूर ते विजापूर हा मोठा महामार्ग गेला आहे. उमदी ते चडचण, उमदी ते जत, उमदी ते सोनलगी, उमदी ते सुसलाद या गावाला जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. त्यामुळे उमदी येथील एस. टी. स्टँडवरती हजारो नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र या स्टँडवरील रस्त्यावरती गेल्या सहा महिन्यापासून प्रचंड खड्डे पडलेले आहेत. याबाबत या परिसरातील नागरिकांनी जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना अनेकवेळा लेखी व तोंडी मागणी करूनही त्यांनी याची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झालेले आहेत, तर चारचाकी वाहनांनाही याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment