Saturday, September 29, 2018

आयुष्यमान भारतसाठी पात्र यादी ग्रामपंचायत, नगरपालिकांमध्ये लावावी


जत,(प्रतिनिधी)-
देशभरातील दहा कोटी गरिबांना आरोग्यसेवेची हमी देणारी आयुष्यमान भारत योजना नुकतीच सुरू झाली आहे. ही योजना गरिबांसाठी असून त्यांच्या आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. देशभरातील 40 टक्के लोकांना याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत असली तरी या योजनेचा लाभ कुणाला मिळाला, याची माहिती होण्यासाठी पात्र यादी सर्व ग्रामपंचायती, नगरपालिकांमध्ये लावण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

2011 मध्ये सामाजिक व आर्थिक सर्व्हेक्षणानुसार पात्र ठरलेल्या, कच्चे घर, कुटुंबप्रमुखपदी महिला, अपंग यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी सदस्य संख्या किती असावी, याची काही मर्यादा नाही. शिवाय यासाठी नव्याने नाव नोंदणी करण्याची गरज नसल्याने अनेकांना या यादीत आपले नाव आहे की नाही, याची कल्पना नाही. अनेक गरजू हे निरक्षर, अल्पशिक्षित आहेत. या लोकांपर्यंत ही माहिती पोहचणे आवश्यक आहे.
या योजनेचा खरोखर लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि ग्रामसेवक यांची मदत घेणे गरजेचे आहे. या योजनेची व्याप्ती मोठी आहे. यापूर्वीची महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून एक लाखापर्यंतची मदत मिळायची. आता या आयुष्यमान भारत योजनेसाठी पाच लाखापर्यंतचे आर्थसहाय्य मिळणार आहे. आता प्रधानमम्त्री जनआरोग्य योजनेंतर्गत गोल्डन ई-कार्ड दिले जाणार आहे. योजनेत समाविष्ट दवाखान्यात आयुष्यमान मित्र असतील. लाभासाठी पात्र असल्याची निश्चिती आधार कार्डाद्वारे होईल. कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र आधार क्रमांकासह द्यावे लागणार आहे. ही माहिती एका डेटाबेसमध्ये भरली जाणार आहे. यासाठी गावपातळीवर शासनाकडून विशेष मोहिम राबवण्याची मागणी होत आहे.
या योजनेतून तब्बल एक हजार 300 विविध आजारांवर उपचार होण्यास मदत होणार आहे. कॅशलेस,पेपरलेस व पोर्टेबल अशी ही योजना आहे.देशातील सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना याचा लाभ मिळणार असून देशातील 13 हजार पेक्षा जास्त सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार होणार आहेत.देशातील कोणत्याही राज्यातील दवाखान्यात उपचार मिळणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा, यासाठी शासनाकडून गावपातळीवर विशेष मोहिम राबवावी आणि पात्र यादी ग्रामपंचायत, नगरपालिकेत लावावी, अशी मागणी होत आहे.



1 comment: