Wednesday, September 26, 2018

'जुनी पेन्शन' मागणीसाठी 2 ऑक्टोबरला शिवनेरी ते आझाद मैदान पेन्शन दिंडी

 सांगली जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी होणार
जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली पेन्शन योजना अन्यायकारक आणि फसवी असून यामुळे कर्मचारी वर्गाचे नुकसान होत आहे. ही योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी शिवनेरी ते आझाद मैदान (मुंबई) पेन्शन दिंडी काढण्यात येणार असून सांगली जिल्ह्यातून हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.
     नवीन 1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपुष्टात आणत,अंशदान पेन्शन योजना खूप फायद्याची आहे असे सांगत ती कर्मचाऱ्यावर थोपवण्यात आली.गेल्या 13 वर्षात ही योजना राबवण्यात सरकारला अपयश आले असून कर्मचाऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे.दरम्यानच्या काळात मृत्यू झालेले कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कोणतेच लाभ मिळाले नाहीत.  जे सेवानिवृत्त झाले त्यांना अत्यंत तोकडे निवृत्ती वेतन मिळत असल्याने सेवानिवृत्ती नंतर या पेन्शनवर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न सर्व कर्मचाऱ्यांना सतावत आहे.काही कर्मचारी या योजनेनुसार सेवानिवृत्त झाले असून शेवटचा पगार 40 हजार घेणाऱ्यास फक्त 1500 रुपये पेन्शन मिळत आहे. राज्यसरकारी कर्मचाऱ्याच्या जुन्या संघटनांनी पेन्शन योजनेबाबत ज्या तीव्रतेने लढा द्यायला हवा होता, तो दिला नाही.आता सर्व युवा कर्मचारी पेन्शन हक्क संघटनच्या नेतृत्वाखाली एकवटले असून ही अन्यायकारी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिवनेरी ते मुंबई पेन्शन दिंडीचे आयोजन केले असून शिवनेरी ते ठाणे संघटनचे शिलेदार धावत येणार आहेत.ठाण्यातून पुढे ही दिंडी 2 ऑक्टोबर पासून पायी चालत जाणार आहे.या दिंडीत राज्यभरातील लाखो कर्मचारी  सहभागी होणार असून शासनाने मागण्या मान्य न केल्यास अमरण उपोषण संघटनचे प्रमुख पदाधिकारी करणार आहेत.सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करत सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी संघटनचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी म्हणाले, पेन्शन दिंडी नियोजनासाठी प्रत्येक तालुकानिहाय बैठका सुरू असून जत,आटपाडी,तासगाव,कडेगाव येथे झालेल्या बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सर्व तालुक्यात पेन्शन हक्क संघटनचे पदाधिकारी नियोजन करत आहेत. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ, नेताजी भोसले,प्रदीप इंगोले,राजकुमार भोसले,शाम राठोड,गुरुबसू वाघोली,बालाजी पडलवार,रमेश मगदुम,मिलन नागणे,अनिल मोहिते,प्रशांत हिटनळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment