जत,(प्रतिनिधी)- जत तालुक्यातील अनेक नागरिकांना दिवसेंदिवस तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेला हेलपाटे मारूनही नवीन विभक्त रेशनकार्ड मिळत नसल्याने अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब ऐवळे व बसवसेनेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांनी रेशनकार्डे त्वरीत देण्यात यावीत,उपोषण करण्यात येईल,असा इशारा दिला होता.तहसिलदार सचिन पाटील यांनी याची दखल घेऊन एका दिवसांत तीनशे रेशनकार्डे उपलब्ध करून दिली. यामुळे आजचे उपोषण रद्द करण्यात आले.
विभक्त व नवीन रेशन कार्डांची गरज लक्षात घेऊन श्री. ऐवळे व बसवराज पाटील यांनी नूतन तहसीलदार सचिन पाटील यांची भेट घेतली प्रलंबित रेशनकार्ड बद्दल सविस्तर माहिती दिली. लवकरात लवकर रेशनकार्डे देण्यात यावीत अन्यथा सोमवार २४ सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. सध्या ग्रामीण भागातील प्रधानमंत्री घरकूल योजनेचे सर्व्हे चालू असल्याने आधारकार्डबरोबर रेशनकार्ड क्रमांक जोडणेही महत्त्वाचे असल्याने काही कुटुंबातील नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्याने सदर कुटुंबाला घरकूला पासून वंचित राहावे लागत होते. होलार समाज आणि बसवसेना या संघटनेच्या उपोषणाच्या इशाऱ्याने तहसिलदारांनी त्वरित प्रतिसाद देऊन तालुक्यातील प्रलंबित अशा तीनशेच्या वर रेशनकार्डांचा प्रश्न एका दिवसांत मार्गी लावला. यामुळे तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
एवढया मोठ्या प्रमाणात प्रलंबित रेशनकार्डांचा निपटारा केल्याने होलार समाज संघटना व बसवसेनेच्यावतीने नुतन तहसिलदार सचिन पाटील यांचे आभार मानण्यात आले. उर्वरित प्रलंबित कार्डे लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले. अजून बाराशेच्यावर लोकांना कार्डे मिळणे बाकी आहे. यावेळी आबासाहेब ऐवळे, बसवराज पाटील, राजेंद्र आरळी, दिनकर पतंगे, संतोष काळे, बाजीराव केंगार, अवधूत चोरमूले, योगेश जाधव, अतूल ऐवळे, शुभम जाधव यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment